नवी दिल्ली –
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल आणि प्रियंका गांधी यांना असलेली विशेष सुरक्षा व्यवस्था (एसपीजी) काढून घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आता या तिघांनाही केवळ सीआरपीएफ व झेड-प्लस सुरक्षा व्यवस्था असेल.
एका अधिकाऱ्याने शुक्रवारी सांगितले की, या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. गृह मंत्रालयाच्या सुरक्षा आढावा समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला.
दरम्यान, केंद्र सरकारच्या या निर्णयाला काँग्रेसने तीव्र विरोध केला आहे. काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी म्हटले आहे की, राजकीय सूडाच्या भावनेतून हा निर्णय घेण्यात आला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येनंतर संपूर्ण गांधी कुटुंबाला ही सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती.
इंदिरा गांधींच्या हत्येनंतर एसपीजी स्थापन : पंतप्रधानांना एसपीजी सुरक्षा व्यवस्था देण्यासाठी १९८८ मध्ये हा कायदा पारित करण्यात आला होता. त्यानुसार २ जून १९८८ रोजी एसपीजी स्थापन झाली. दिल्लीत याचे मुख्यालय आहे.
इंदिरा गांधी यांची ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी हत्या झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला होता. अगोदर केवळ पंतप्रधानांना ही सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय झाला होता. मात्र, २१ मे १९९१ रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर गांधी कुटुंबीयांना ही सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.