राहुरी ;- डॉ. तनपुरे सहकारी साखर कारखान्या संदर्भात खोट्या बातम्या पसरवू नका. ८० कोटी रुपयांची साखर कारखान्याच्या गोडाऊनमध्ये पडून आहे. ऊस पुरवठादारांचे केवळ ६१ कोटी रुपये दोन हजार ४२५ रुपये एफआरपीप्रमाणे देयक आहे. यामुळे आरआरसीच्या कारवाईबाबत खोट्या बातम्या देणाऱ्यांनी कारखान्याची बदनामी थांबवावी; अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा डॉ. सुजय विखे यांनी पत्रकार परिषदेत दिला.
सभासदांचा, ऊस उत्पादकांचा एकही रुपया कोणत्याही प्रकारे ठेवला जाणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. डॉ.विखे यांनी माहिती देताना सांगितले की, तनपुरे कारखान्याने चालू वर्षी गाळपाचे ध्येय गाठण्याच्या उद्देशाने आगेकूच केलेली आहे. जास्तीत जास्त गाळप उद्दिष्ट्य असून २ लाख ५० हजार गाळप पूर्ण केलेले आहे.
केंद्र शासनाच्या धोरणानुसार साखर विक्री करण्यास मर्यादा आहे. त्यामुळे एफआरपीची रक्कम अदा करण्यास तांत्रिक अडचण आहे. साखर आयुक्त यांनी आरआरसी कारवाईची नोटीस दिलेली आहे. साखर आयुक्त साखर विक्रीला परवानगी देत नसल्याने जिल्हाधिकारी यांनीच पुढे येऊन साखर विक्री करावी. अन्यथा साखर विक्रीची परवानगी संचालक मंडळास द्यावी.
आजमितीला कारखान्याच्या गोडाऊनमध्ये २ लाख ४३ हजार ९६५ क्विंटल साखर पडून आहे. आतापयंर्त शासनाने केवळ ३६ हजार पोते साखर विकण्याची मुभा दिली होती.शिल्लक साखरेबाबत बँकेकडे गहाण प्रस्ताव मांडला. ४ ते ५ मोठ्या बँकांकडे गेलो होतो. मात्र, कारखान्यावर ३०० कोटी रुपयांचे कर्ज असल्याने साखर पोत्यांवर कर्ज मिळाले नाही. परिणामी साखर विक्री करून ऊस पुरवठादारांचे पैसे देण्याशिवाय पर्याय नाही.
जिल्हाधिकारी यांनीच आरआरसी कारवाई करण्यापेक्षा संचालक मंडळाला साखर विक्रीची परवानगी द्यावी, ही संचालक मंडळाची इच्छा आहे. किंवा तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली माझ्यासह कारखान्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची समिती नेमून साखर विक्री करावी.
३१०० रुपये साखर दराने विक्री झाली तरी ८० कोटी रुपये उपलब्ध होतील. ऊस उत्पादकांचे देणे अदा होऊन २० कोटी रुपये कारखान्याला शिल्लक राहणार आहेत. यामुळे कारखान्याची आर्थिक स्थिती भक्कम आहे. कारखाना आर्थिक अडचणीत असल्याच्या वावड्या कोणीही उठवू नये.