ह्युस्टन : ‘मोदी… मोदी…’चा गजर रविवारी अमेरिकेतही निनादला. संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ह्यूस्टनमधील ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कौतुकाचा हा गजर झाला. या कार्यक्रमाला ५० हजार मूळ भारतीय अमेरिकन नागरिकांसह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अनेक मेयर तसेच सिनेटर उपस्थित होते.
या कार्यक्रमात दोन्ही नेत्यांनी एकमेकांची प्रशंसा करतानाच द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याचे एकमेकांना अभिवचन दिले. भारताचा खरा मित्र ‘व्हाईट हाऊस’मध्ये असल्याचे उद्गार या वेळी पंतप्रधान मोदी यांनी काढले. या प्रसंगी भारतीय संस्कृती दर्शवणारे विविध कार्यक्रमही सादर करण्यात आले.सात दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर असलेले भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे रविवारी अमेरिकेत जोरदार स्वागत करण्यात आले.
त्यांच्या स्वागतासाठी आयोजित करण्यात आलेल्या ‘हाऊडी मोदी’ कार्यक्रम स्थळी मोदींच्या आगमनानंतर जल्लोष झाला. या प्रसंगी उपस्थित ५० हजार भारतीयांनी ‘मोदी… मोदी…’चा नारा लावला होता. अमेरिका आणि भारताच्या राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्तुतीने मोदी यांनी भाषणाला सुरुवात केली. जागतिक राजकारणात ट्रम्प यांचे नाव आदराने घेतले जात असल्याचे त्यांनी सांगितले. ‘अब की बार ट्रम्प सरकार’चा नाराही त्यांनी या वेळी दिला.