संगमनेरमध्ये अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार.

संगमनेर :- तालुक्यातील मांडवे खुर्द शिवारात मुळा नदीवरील मांडवे पुलावर ट्रक आणि मोटार सायकल यांच्यात धडक झाली. या अपघातात मोटारसायकल स्वार जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमी झाला आहे. 

भरधाव जाणाऱ्या रिकाम्या मालट्रकची धडक बसून दुचाकीस्वाराचा जागीच चिरडून मृत्यू झाला. दुचाकीवरील त्याचा सहकारी गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी अपघातस्थळी मालट्रक पेटवून दिला. ही घटना शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घडली. 

संगमनेर तालुक्यातील मांडवे बुद्रूक गावाच्या शिवारात मुळा नदीवरील पुलाजवळ ही घटना घडली. शरद मच्छिंद्र डोलनर (वय २५, मांडवे ब्रुद्रूक, संगमनेर) असे मृत तरुणाचे नाव आहे. 

डोलनर हा उच्चशिक्षित होता. त्याचा सहकारी विठ्ठल नामदेव बाचकर (२५, मांडवे बुद्रुक) हा युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर संगमनेरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

टाकळी ढोकेश्वरकडून (तालुका पारनेर) संगमनेरमधील साकूरच्या दिशेने एम. १६ डब्ल्यू ९१९५ या क्रमांकाचा मालट्रक येत होता. समोरुन येणाऱ्या दुचाकीवरील दोघा तरुणांना ट्रकची जोराची धडक बसली. त्यात डोलनर ठार झाला. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी मालट्रक पेटवून दिला. 

अपघातानंतर ट्रकचालक तेथून पसार झाला होता. घारगाव पोलिसांना घटनेची माहिती मिळताच निरीक्षक अंबादास भुसारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग शमवण्यासाठी अग्निशामक दलास पोलिसांनी बोलावून घेतले. मात्र, तोपर्यंत ट्रक आगीत भस्मसात झाला होता. 

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

Recent Posts