पारनेर :- शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेले निलेश लंके कोणत्या पक्षात जाणार याबाबत ब-याच दिवस चर्चेला उधाण आले होते.
मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने डाव टाकून लंके यांना आपलेसे करून घेतले आणि पोकळ उठणा-या वावड्यांना पूर्णविराम दिला.
तालुकाध्यक्ष निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.
पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे लंके यांनी राष्ट्रवादीच्या कार्यालयात पत्रकार परिषदेत सांगितले.
निलेश लंके यांनी सांगितले की, मी शिवसेनेचे २० वर्षापासून एकनिष्ठ व १५ वर्ष तालुकाध्यक्ष, अडीच वर्ष पंचायत समिती उपसभापती, नियोजन समितीवर काम केले आहे. तसेच पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहेत.
मी शिवसेना पक्षाच्या वाढीस कायम काम केले तरीही माझ्यावर अन्याय करून मला बढतर्फ केले. पक्षातील श्रेयवादाचा कलह पक्षप्रमूख उध्दव ठाकरे यांच्यापर्यत गेला असता हलक्या कानाच्या पक्षप्रमूखांनी मला पक्षातून काढून टाकले.
विधानसभा लढणार असा प्रचाराचा नारा देऊन शिवसेनेच्या विरोधात दंड थोपटून औटी यांना शह देण्यासाठी लंके यांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. जनतेचा मोठा प्रतिसाद त्यांना लाभत आहे.
दरम्यान लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याने जिल्हापरिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांचे काय हा प्रश्न उपस्थीत होत असून लंके यांच्या प्रवेशानंतर आगामी विधानसभा निवडणुकीत कोणाला तिकीट मिळणार हे पहाणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शेतक-यांचे कैवारी, जनतेचे दुःख ज्यांना कळते त्या शरद पवार यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन मी माझे कार्य करणार आहे. पारनेर येथे होणा-या जाहीर सभेत मी व माझ्या तालुक्यातील ५० ते ६० हजार कार्यकर्त्यांसमवेत राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश करणार आहे – निलेश लंके.