राहुरी :- पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देऊन जिवे ठार मारल्याच्या आरोपावरून जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.आर.जगताप यांनी आरोपी अमोल संभाजी शेलार रा. केसापूर, ता- राहुरी,यास दोषी धरून जन्मठेप व ६,५००रू.दंडाची शिक्षा सुनावली आहे.
या खटल्याची सविस्तर माहिती अशी की, राहुरी तालुक्यातील केसापूर येथे अमोल संभाजी शेलार व त्याची पत्नी जयश्री हे एकत्र राहत होते. आरोपी अमोल हा पेंटर आहे. त्याला दारू पिण्याची सवय असून, तो नेहमी दारू पिऊन जयश्री हिच्याबरोबर विनाकारण भांडण करीत असे.
तो कधीतरी सुधारेल या आशेवर जयश्रीने त्याच्याविरुद्ध तक्रार केली नाही. दिनांक १/६/२०१७ रोजी सकाळी जयश्री भांडे घासत असताना घरगुती कारणावरून आरोपी अमोल याने जयश्री हीस शिवीगाळ करून भांडण करण्यास सुरुवात केली.
त्यावेळी जयश्री हिने अमोल ह्यास तुमचे रोजचेच आहे. शिव्या देऊ नका, मारहाण करू नका असे म्हणाली याचा राग आल्याने आरोपी अमोल याने थांब तुझा काटाच काढतो, असे म्हणून लगेच घरामध्ये ऑइलपेंट मध्ये मिसळण्याकरता असलेले रॉकेल जयश्रीच्या अंगावर ओतले व काडीपेटीतील काडीने पेटवून दिले.
त्यामुळे जयश्रीच्या साडीने पेट घेतला. त्यावेळी तिने जोरजोरात आरडा-ओरड केली. जेव्हा तिची जाऊ वैशाली, अमोल व शेजारीपाजारी लोकांनी तिला विझवले. त्यात ती भाजल्याने गंभीर जखमी झाली. तिला उपचारार्थ प्रथम श्रीरामपूर येथील कामगार हॉस्पिटल व नंतर नगर येथील सिटीकेअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले.
दिनांक ३/६/२०१७ रोजी जखमी जयश्री हिचेवर उपचार सुरू असताना तिने विशेष न्यायदंडाधिकारी जे.पी जोशी,यांनी डॉ. अमित पवळे. यांच्या तपासणीअंती व सहा. फौजदार जे.जी.बटुळे यांनी केलेल्या पत्रव्यवहारानुसार मृत्युपूर्व जबाब घेतला होता.
दिनांक ६/६/२०१७ रोजी जयश्री मयत झाली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांनी केला. या खटल्यात सरकार पक्षातर्फे एकूण ७ साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीविरुद्ध दिलेली साक्ष, दाखल कागदपत्रे व परिस्थितीजन्य पुरावा या आधारे आरोपी अमोल संभाजी शेलार याला दोषी धरून न्यायालयाने जन्मठेप व ६,५०० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली.