Ahmednagar breaking : अहमदनगर शहरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चितळे रस्त्यावरील भाजी मार्केटजवळ पाकिस्तानच्या झेंड्यासारखी रांगोळी काढण्यासह घटना घडली. यातून दोन समाजात तेढ व द्वेष भावना निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी महिलेसह दोघांविरुध्द पोलिसांत गुन्हा दाखल केला गेला आहे.
ही घटना मंगळवारी घडली आहे. गोपनीय शाखेचे अंमलदार रावसाहेब खेडकर यांच्या फिर्यादीनुसार तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. सचिन पळशीकर (रा. भराड गल्ली, नगर) व एक अनोळखी महिला असे आरोपींचे नावे आहेत.
सविस्तर माहिती अशी : दसरा सणाच्या निमित्ताने तोफखाना पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन रणदिवे व त्यांचे पथक मंगळवारी सकाळी चितळे रस्त्यावर गस्त घालत होते.
त्यांना भाजी मार्केट कमानी जवळ भैरवनाथ ट्रस्ट कमानी समोर महिला व पुरूष रस्त्यावर दोन चारचाकी वाहने आडवी लावून रांगोळी काढताना दिसले. पथकाने पाहणी केली असता एक रांगोळी पाकिस्तानच्या झेंड्या सारखी असल्याची त्यांना जाणवली.
यावरून पोलिसांनी त्या दोघांविरूध्द प्रवाशांना अडथळा निर्माण होईल व दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याच्या प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, एका हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दहशतवादाला समर्थन करणाऱ्या पाकिस्तानचा निषेध करण्यासाठी ही रांगोळी काढण्यात आली होती, असे सांगितले जात आहे.