Ahmadnagar Breaking : जामखेड तालुक्यातील खर्डा येथे मराठा आरक्षणाचा विषय चांगलचा तापला असून, खर्डा येथील युवक संतोष साबळे याने टॉवरवर बसून शोले स्टाईल आंदोलन सुरू केले. अखेर पत्रकारांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन साबळे याने आंदोलन मागे घेतले.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला संपूर्ण राज्यातून पाठिंबा मिळत असून, अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना गावबंदी करण्यात आली आहे. राज्य सरकारने आरक्षण देण्याचे आश्वासन न पाळल्याने येथील मराठा युवक संतोष साबळे यांने एका कंपनीच्या मोबाईल टॉवरवर चढून एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ, जय शिवराय, मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशा घोषणा देत टॉवर चढून आंदोलन छेडले.
परिसरातील नागरिकांनीट त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती. सर्व जण संतोषला खाली येण्याचे आवाहन करीत होते, परंतु संतोष साबळे हा कोणाचेही ऐकण्यास तयार नव्हता, त्यामुळे खर्डा व परिसरात मोठी खळबळ उडाली होती;
परंतु खर्डा प्रेस क्लबचे अध्यक्ष संतोष थोरात, पत्रकार दत्तराज पवार, अनिल धोत्रे, धनसिंग साळुंके, श्वेताताई गायकवाड यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन संतोष साबळे हा टॉवरवरून खाली उतरल्यामुळे खर्डेकरांचा जीव भांड्यात पडला.
त्यानंतर संतोष साबळे यांना खर्डा पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आले. या वेळी साबळे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, माझा जीव देण्याचा प्रयत्न नव्हता; परंतु प्रशासनाला व राज्य सरकारला जाग यावी, या उद्देशाने मी हे आंदोलन केले असल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी साबळे याला समन्स देऊन सोडून दिले.
या वेळी खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर, पोलीस हेडकॉन्स्टेबल संभाजी शेंडे, वैजनाथ मिसाळ, शशिकांत मस्के यांच्यासह सरपंच वैजनाथ पाटील,
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र सुरवसे, माजी पंचायत समिती सदस्य विजयसिंह गोलेकर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुनील लोंढे, राष्ट्रवादी तालुका उपाध्यक्ष कल्याण सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश गोलेकर, गणेश ढगे, प्रकाश सोनटक्के यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.