Ahmednagar Breaking : तालुक्यातील बेलवंडी पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्याने राजकीय व्यक्तीच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमाची माहिती शालेय स्तरावरील विद्यार्थ्यांना देत कार्यक्रमासाठी पाहिजे ती मदत करण्याचे
आश्वासन दिल्याचा व्हीडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाल्याने पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी त्या कर्मचाऱ्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई करत त्या कर्मचाऱ्याची खातेनिहाय चौकशीचे आदेश काढले.
भाऊसाहेब ज्ञानदेव शिंदे, असे त्या पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बेलवंडी पोलिस ठाण्यात कार्यरत असणारे पोलिस कर्मचारी भाऊसाहेब ज्ञानदेव शिंदे हे दि. २० फेब्रुवारीपासून रजेवर होते.
या काळात त्यांनी आ. निलेश लंके यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शिवपुत्र संभाजी, या कार्यक्रमाची माहिती विद्यार्थ्यांना देत असताना या कार्यक्रमासाठी लागेल ती मदत करण्याचे आश्वासन दिल्याचे व्हीडीओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाले.
व्यासपीठावर जाऊन भाषण करत त्या राजकीय नेत्याला मदत करण्याचे आश्वासन देत असल्याचा व्हिडिओ काही जणांनी पोलिस अधीक्षक राकेश ओला यांना देत संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली.
या घटनेची पोलिस अधीक्षकांनी तत्काळ दखल घेत याप्रकरणी प्राथमिक चौकशी करत पोलिस कर्मचारी भाऊसाहेब शिंदे यांचे तडकाफडकी निलंबन करत त्यांची खातेनिहाय चौकशी करण्याचे आदेश काढले. या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.