Parner Breaking : पारनेर तालुक्यातील भाळवणी – जामगाव रोडवर भाळवणीपासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सबस्टेशननजीक मारुती कारने रस्त्यालगत असलेल्या
झाडाला धडकून पलटी झाल्याने काही वेळातच पेट घेतल्यामुळे नागरिकांना ‘द बर्निंग कारचा’ थरार पाहावयास मिळाला. ही घटना मंगळवारी (दि.७) दुपारी १२ च्या सुमारास घडली.
या घटनेची सविस्तर माहिती अशी की, सदरची कार भाळवणीहून जामगावच्या दिशेने जात असताना चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने सदरची कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकून साईड गटारीमध्ये पलटी झाली.
यानंतर काही वेळातच गाडीने पेट घेतला. गाडी विझविण्यासाठी कोणतीही यंत्रणा उपलब्ध नसल्यामुळे गाडी पूर्णतः जळून खाक झाली.
याविषयी अधिक माहिती घेतली असता, गाडीमध्ये तीन मुले व एक मुलगी असल्याचे समजले. यातील मुले व एक मुलगी गाडीची काच फोडून बाहेर आल्याने ते बालंबाल बचावले. हे सर्वजण घाबरल्याने घटनास्थळापासून पसार झाले,
यामुळे त्यांची नावे समजू शकले नाहीत. या घटनेच्या आवाजाने नजिकच्या घरातील नागरिक भयभीत झाले तसेच घटनास्थळावर नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.
या घटनेतील मुले व मुलगी प्रसार झाल्यामुळे ही घटना ‘नाजूक’ संबंधातून घडली असल्याचे नागरिकांमधून बोलले जातात होते, तर घटनेतील कारवर नंबर प्लेट नसल्यामुळे ही गाडी चोरीची असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
यासंदर्भात पारनेर पोलिसांची संपर्क साधला असता, या घटनेची नोंद झाली नसल्याची माहिती मिळाली आहे.