Ahmadnagar Breaking : नवरात्रोत्सवानिमित्त बुऱ्हाणनगर येथील देवी मंदिरात दर्शनासाठी गेलेल्या अनेक महिलांचे लाखो रुपयांचे सोन्याचे दागिने चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेत चोरल्याची घटना मंगळवारी (दि.१७) सकाळी ११.३० ते ११.४५ च्या दरम्यान घडली.
विशेष म्हणजे या देवी मंदिर परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही चोरट्यांनी हातसफाई करत पोलिसांना आव्हान दिले आहे.
नवरात्रोत्सवानिमित्त श्रीक्षेत्र तुळजापुरला जाणाऱ्या पालखीचे आगमन मंगळवारी (दि. १७) सकाळी तिसऱ्या माळेला बुऱ्हाणनगर (ता. नगर) येथे झाले होते. येथील श्री अंबिका तुळजाभवानी मंदिराचे पुजारी भगत कुटुंबीयांकडून तुळजापुर पालखीचे उत्साहात व भक्तिभावाने स्वागत व पूजन करण्यात आले. या वेळी देवीच्या तसेच पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.
तिसऱ्या माळेला पालखीच्या आगमनानिमित्त या ठिकाणी मोठी यात्रा भरत असते, त्यामुळे मंगळवारी मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त मोठया प्रमाणात तैनात करण्यात आला होता. पालखीचे आगमन होताच दर्शनासाठी झालेल्या गर्दीत अनेक महिला भाविकांचे दागिने चोरट्यांनी लांबविले.
दागिने चोरीला गेल्याचे लक्षात आल्यावर तीन महिलांनी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात धाव घेत चोरीची माहिती दिली. या तीन महिलांचे एकूण २ लाख १० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत.
त्यातील मनिषा दिनेश ढूमने ( रा. नंदनवन नगर, सावेडी ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. देवी मंदिर परिसरात अन्य काही महिलांचे दागिनेही चोरीला गेले आहेत. मात्र, त्यांनी काही कारणास्तव फिर्याद दिली नसल्याचे सांगण्यात आले.