अहमदनगर Live24 टीम, , 05 फेब्रुवारी 2022 :- विधानसभा निवडणुकीला अजून बराच अवधी बाकी असला तरी यासाठी तालुक्यातील दोन बड्या नेत्यांनी आताच तयारी सुरू केली असल्याचे चित्र तयार झाले.
माजी आमदार राहुल जगताप आतापासून तयारीला लागले आहेत, तर अनुराधा नागवडे यांची एन्ट्री लवकर होणार असल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगत आहेत.
आमदार बबनराव पाचपुते हे आता आजारपणातून बऱ्यापैकी सावरत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे त्यांनीही जनसंपर्क सुरू केला आहे. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका हे आगामी विधानसभा निवडणुकीची दिशा ठरवणार आहेत.
थोडक्यात येथे होऊ शकणारी वातावरण निर्मिती विधानसभेसाठी आपल्याला पोषक करून घेण्यासाठी पाचपुते, जगताप, नागवडे या तिघांचाही प्रयत्न राहील. माजी मंत्री आमदार बबनराव पाचपुते यांचे पुत्र विक्रमसिंह पाचपुते २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपासून राजकारणापासून अलिप्त आहेत.
२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आमदार पाचपुते यांच्या प्रचारार्थ कंबर कसली अन् वडील बबनराव पाचपुते यांना विजयी करण्यासाठीं त्यांचा सिंहाचा वाटा उचलला. पण, निकालानंतर पुन्हा राजकारणातून वरवर काढता पाय घेतला.
असे असले तरी आपल्या खासगी कारखान्याच्या अडचणी सुटल्यावर आपण जोमाने राजकारणात उतरू, असे ते बोलून दाखवत आहेत.
या अनुषंगाने बबनराव पाचपुते यांनी आपले पुत्र विक्रम यांना पुढे आणण्याचे ठरवले असल्याची खात्रीपूर्वक माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली. हिरडगाव येथील साईकृपा कारखान्याच्या अडचणी सुटल्यात जमा आहेत.
त्यामुळे विक्रम यांना देखील राजकारणाचे वेध लागले आहेत. स्वभावातील मृदुपणा आणि संयम हे विक्रम यांचे वैशिष्ट्य आहे.
एकेकाळी ते खासदारकीसाठी प्रबळ दावेदार मानले जायचे. पण आता खासदारकी लढवणे शक्य नाही, हे त्यांनाही माहीत आहे.
त्यामुळे त्यांना विधानसभेतून पुढे जावे लागेल. आगामी निवडणुकात ते पाचपुते यांच्या राजकारणाची सूत्रे कशी हाताळतात यावर बरीच गणिते अवलंबून राहतील.
पुढच्या राजकारणासाठी विक्रम यांनाच पुढे आणा, यासाठी पाचपुते यांना मानणारा एक गट सक्रीय आहे.