अहमदनगर Live24 :- लॉकडाऊन असल्याने कोणत्याही प्रकारचा डामडौल न करता पुण्यातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे किरण वसंत निंभोरे आणि पोलीस उपनिरीक्षक राणी वाल्मिक डफळ या दोघांचा अनोखा लाईव्ह विवाह सोहळा नुकताच घोटवी गावी घरामध्ये पार पडला.
सुमारे वर्षभरापूर्वी ठरलेल्या या विवाहासाठी अपेक्षित असणारा खर्च पुण्यात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणार्या आणि लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या सुमारे दोन हजार विद्यार्थ्यांचा दोन वेळच्या जेवणासाठी करण्यात येणार आहे.
लॉकडाऊनमुळे सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करत तालुक्यातील घोटवी गावचे वसंत निंभोरे यांचे चिरंजीव किरण आणि येळपणे गावचे वाल्मिक डफळ यांची कन्या राणी यांचा विवाह सोमवार दि. 27 एप्रिल रोजी सायं. 4 वाजून 45 मिनीटांनी आई-वडिलांच्या साक्षीने व भटजीच्या मंत्रोच्चरामध्ये लाईव्ह पार पडला.
पहा व्हिडीओ –
या अनोख्या विवाह सोहळ्यास नातेवाईक, मित्रपरिवार अशा तब्बल पंधराशे वर्हाडी मंडळींनी ऑनलाईन हजेरी लावली. विवाहाचे थेट प्रक्षेपण ‘वास्तव कट्टा’ या यूट्यूब चॅनलवर आणि ‘एमपीएससी स्टुडंट राईट्स’ या फेसबुक पेजवरून करण्यात आले.
पुण्यात एमपीएससी स्टुडंट राईट्स या संस्थेच्या माध्यमातून किरण यांनी गेली दोन-तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेसाठी झटणार्या समवयस्कर विद्यार्थ्याच्या खानावळीपासून ते परिक्षा फीचा विषय घेऊन थेट मंत्रालयापर्यंत धडक मारली.
तसेच ते वास्तव कट्टा या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आहे. तर वधू राणी डफळ पोलीस उपनिरीक्षक म्हणून मालेगाव येथे कार्यरत आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®