रोहित पवार-प्रा.शिंदे यांच्यातला सामना रंगणार
लक्षवेधी लढत: कर्जत-जामखेड मतदारसंघ
कर्जत-जामखेड मतदारसंघावर गेल्या 25 वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचं वर्चस्व आहे. त्याला कारणही इथली समाजरचना. नगर जिल्ह्यात पहिलं कमळ फुलविण्याचा मान याच मतदारसंघाकडं जातो. मतदारसंघ आरक्षित असतानाही इथं भारतीय जनता पक्षाचाच आमदार होता आणि मतदारसंघ खुला झाल्यानंतरही भाजपचंच वर्चस्व कायम राहिलं.
लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत या मतदारसंघातून प्रा. राम शिंदे हेच निवडून जातील, असं छातीठोकपणे सांगितलं जात होतं; परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी या मतदारसंघात लक्ष घालायला सुरुवात केल्यानं या मतदारसंघाची चर्चा राज्यभरच नव्हे, तर देशपातळीवर व्हायला लागली. प्रा. शिंदे गेल्या पाच वर्षांपासून मंत्री आहेत.
अगोदर राज्यमंत्री असताना त्यांच्याकडं मुख्यमंत्र्यांकडील बहुतांश खाती होती. त्यानंतर त्यांना पदोन्नती मिळाली. कॅबिनेट मंत्रिपदं मिळालं. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा त्यांनी विश्वास संपादित केला आहे. पालकमंत्रिपदही त्यांच्याकडंच होतं. पालकमंत्रिपद असल्यानं त्यांनी त्याचा वापर कुकडीचं पाणी कर्जतला नेण्यासाठी केला.
त्यामुळं श्रीगोंदे, पारनेर तालुक्यातील नेतेमंडळी नाराज झाली,तरी त्यांनी त्याची पर्वा केली नाही. पालकमंत्रिपदाचा वापर करून त्यांनी जामखेड-कर्जत तालुक्यासाठी जास्तीत जास्त निधी नेण्याचा प्रयत्न केला. असं असलं. तरी त्यांच्या काळात मतदारसंघात झालेल्या कामाच्या दर्जाबाबत थेट ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्यापर्यंत तक्रारी गेल्या होत्या.
प्रा. शिंदे जलसंधारण मंत्री होते. त्यांच्या काळात झालेल्या जलसंधारणाच्या कामांबाबतही विवाद निर्माण झाले. त्यांना जामखेड-कर्जत तालुक्यात सरकारी कामं करता आली; परंतु युवकांच्या हाताला काम मिळावं, यासाठी काही करता आलं नाही. साधा कर्जतच्या आगाराचा प्रश्न मार्गी लावता आला नाही. जामखेड-कर्जत तालुक्यातील रस्त्यांची स्थिती चांगली नाही.
जामखे़ड शहराच्या पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. भुतवडा तलावातील पाणी पुरत नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर जामखेडच्या पाणी योजनेला मंजुरी मिळाल्याचा आदेश काढून आणला; परंतु पाच वर्षे त्यावर काहीच का करता आलं नाही, हा प्रश्न उरतो. शिवाय मतदारसंघातील कामं ठराविक बगलबच्च्यांना दिलं जातं. त्यातही मंत्र्यांचे स्वीय सहायकच महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं दिसतं. त्यामुळंही नाराजी आहे.
कर्जत आणि जामखे़ड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमधील सुंदोपसुंदी, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांचं हाडवैर, निवडणुकीत कोणत्याही थराला जाऊन अभद्र युती करण्याची परंपरा याचा अचूक फायदा प्रा. शिंदे उठवत राहिले. आता तर त्यांच्या मदतीला राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा गटही आला आहे.
रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र डागण्याचं काम खासदार डाॅ.सुजय विखे करीत आहेत. बाहेरचा उमेदवार म्हणून त्यांच्यावर टीका केली जात होती. पवार आणि विखे घराण्यात गेल्या चार दशकांत कमालीची कटुता आहे. तिस-या पिढीतही ती कायम आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेत एकवाक्यता आहे.
तशी एकवाक्यता या मतदारसंघातील दोन्ही काँग्रेसमध्ये नव्हती; परंतु रोहित यांना आता ती साधावी लागेल. अंबालिका कारखान्याच्या माध्यमातून त्यांचा शेतक-यांशी संपर्क असतो. कारखान्याच्या माध्यमातून तसंच अन्य सामाजिक संस्थाच्या माध्यमातून त्यांनी भागात अनेक विकासाची कामं केली. सरकारी यंत्रणांवर अवलंबून न राहता जलसंधारणाची कामं हाती घेतली.
अजित पवार उपमुख्यमंत्री असताना त्यांनी या भागातील रस्ते आणि विजेचा प्रश्न सोडवण्यासाठी मोठी मदत केली. रोहित पवार यांनी आता कर्जत तालुक्यात शेती घेतल्यानं त्यांना कुणी उपरा म्हणण्याच्या टीकेतील धार आता कमी होईल.
कर्जात-जामखेडमधील युवकांसाठी त्यांनी मोठमोठे करिअर मेळावे घेतले. गोरगरीबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शारदा आणि विद्या प्रतिष्ठानच्या वेगवेगळ्या शैक्षणिक दालनाची कुलुपे खोलली. कोणतीही अडचण आली, तरी रोहित लगेच धावून जातात, मदतीचा हात देतात, धीर देतात, हे गेल्या काही महिन्यांत वारंवार दिसलं आहे.
कर्जत-जामखेड मतदारसंघात सर्वाधिक मतदार मराठा समाजाचे आहेत. त्यानंतर धनगर, वंजारी, मुस्लिम, दलित, माळी समाज आहे. या मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडी आणि मनसेचा उमेदवारही रिंगणात आहेत.
ज्यांनी बंडखोरीच्या डरकाळ्या फोडल्या, त्यांच्या डरकाळ्यांचं म्याव म्यावमध्ये रुपांतर करण्यात भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष यशस्वी झाले. प्रा. शिंदे यांच्यामागं युतीच्या कार्यकर्त्यांचं बळ आहे, तर रोहित यांच्यामागं बारामतीची यंत्रणा आणि कर्जत-जामखेडमधील संस्थांत्मक बळ आहे.
रोहित यांचा समाजमाध्यमातला वावर युवकांचा चांगलाच भावतो आहे. साखर, पाणी यासह अन्य विषयांवरचा त्यांचा अभ्यासही दांडगा आहे. त्यांच्याकडं शरद पवार यांचा राजकीय वारसदार या रुपात पाहिलं जातं. प्रा. शिंदे यांच्यामागं धनगर आणि वंजारी समाजाचं पाठबळ आहे. राज्याच्या ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्यांशी प्रा. शिंदे यांचे चांगले संबंध आहेत.
कर्जत-जामखेडच्या शेजारी असलेल्या इंदापूर मतदारसंघात राष्ट्रवादीनं धनगर समाजाला दिलेली उमेदवारी आणि पाथर्डी-शेवगाव या विधानभा मतदारसंघात वंजारी समाजाच्या नेत्याला दिलेली उमेदवारी यामुळे जामखेड-कर्जतमधील या दोन्ही समाजात पुरेसा स्पष्ट संदेश जाण्याची व्यवस्था राष्ट्रवादीनं केली आहे. प्रा. शिंदे आणि रोहित यांच्यातील लढत काट्याची होणार असल्याचा संदेश दोघांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनातून मिळाला आहे.