Ahmadnagar Breaking : गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार नसताना निष्काळजीपणाने अपूर्ण गर्भपात करून महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या राजूर येथील डॉ. बी. टी. गोडगे यांच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत राजूर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अकोले तालुक्यातील शेनित येथील सीताबाई संदीप तळपे (वय २४) या महिलेचा ११ मार्च ते १२ मार्च सकाळी या काळात मृत्यू झाला होता.
याबाबत पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्याने पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मयत महिलेचा मृतदेह प्रवारानगर लोणी येथे विच्छेदनासाठी पाठवला होता. या विच्छेदन अहवालात मयत महिलेचा अर्धवट गर्भपात असे मृत्यूचे कारण असल्याचे नमूद केले होते.
त्यावरून नमूद आकस्मिक मृत्यूचा तपास करत असताना पोलिसांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांचे मत मागवले होते. यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी नेमलेल्या समितीने औषधोपचाराच्या कागदपत्रांची तपासणी करून
गोडगे यांना गर्भपात करण्याचा कायदेशीर अधिकार नसल्याचे सांगत मयत तळपे हिच्यावर केलेले औषधोपचार योग्य नव्हते. त्यांनी वैद्यकीय गर्भपात अधिनियम (एम. पी. टी.) या कायद्याचा भंग केला,
असा लेखी अभिप्राय दिला. या अहवालानुसार पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक जे. एफ. शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून डॉ. बी. टी. गोडगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.