Corona virus : गेल्या सुमारे चार आठवड्यांत कोविड-१९ च्या जगभरातील रुग्णसंख्येत ५२ टक्क्यांनी वाढ झाली असून, या काळात ८ लाख ५० हजारांहून अधिक रुग्णांची नोंद झाल्याची माहिती ‘जागतिक आरोग्य संघटने’ च्या ताज्या अहवालातून देण्यात आली आहे.
या अहवालानुसार, गेल्या २८ दिवसांच्या कालावधीच्या तुलनेत या काळामध्ये कोविड बळींच्या संख्येत ८ टक्क्यांनी वाढ झाली असून, ही संख्या सुमारे ३ हजार एवढी आहे.
जगभरात कोविडचा उद्रेक झाल्यापासून यंदाच्या १७ डिसेंबरपर्यंत जगभरातील ७७२ दशलक्ष लोकांना या आजाराची बाधा झाली असून, सुमारे ७० लाख लोकांचा त्यात बळी गेला आहे.
आताच्या ताज्या उद्रेकामध्ये १ लाख १८ हजारांहून अधिक नव्या कोविड रुग्णांना रुग्णालयांत दाखल करण्यात आले असून, १६०० रुग्ण अतिदक्षता विभागात असल्याची नोंद आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने कोविड च्या ‘बीए. २.८६ ओमायक्रॉन’ या प्रकाराच्या ‘जेएन. १’ या उपप्रकारास ‘व्हेरिएंट ऑफ इन्ट्रेस्ट’ असे घोषित केले आहे. गेल्या काही आठवड्यांत या उपप्रकाराचा बाधा वेग वाढल्याचे दिसत आहे.
मात्र, या उपप्रकाराने असलेला आरोग्यधोका हा कमी आहे. सध्याच्या कोविड लसी या जेएन.१ वर परिणामकारक असून, या उपप्रकाराने होणाऱ्या मृत्यूंना रोखण्यास त्या सक्षम आहेत.
दरम्यान, केवळ कोविडच नव्हे, तर इन्फ्लूएन्झा, आरएसव्ही आणि बालकांतील न्यूमोनिया हे आजारही सध्या वृद्धिंगत असल्याचे या अहवालात म्हटले आहे.