अहमदनगर Live24 टीम, 21 डिसेंबर 2021 :- ओमायक्रॉनची बाधा झालेल्या रुग्णसंख्येतील तीव्र स्वरूपाच्या वाढीने जगभरातील भांडवली बाजारातील गुंतवणूकदारांनी धसका घेतला आणि त्याचा परिणाम म्हणजे आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजे सोमवारी शेअर बाजार कोसळला.(Share Market)(Omicron )
सोमवारी सेन्सेक्स-निफ्टी या दोन्ही प्रमुख निर्देशांकांचे मोठे नुकसान झाले. सेन्सेक्स १,१८९.७३ अंशांनी आपटला आणि ५५,८२२.०१ वर दिवसअखेर त्याने विश्रांती घेतली.
तर निफ्टीमधील ३७१ अंशांच्या गटांगळीने हा निर्देशांक १६,६१४.२० पातळीवर घरंगळला. या मोठ्या पडझडीमुळे सेन्सेक्सने चार महिन्यांपूर्वी म्हणजे २३ ऑगस्टला मागे सोडलेल्या नीचांकपदी पुन्हा फेर धरलेला दिसून आले.
दोन्ही प्रमुख निर्देशांक सेन्सेक्स आणि निफ्टीमधील सोमवारची पडझड ही अनुक्रमे २.९० टक्के आणि २.१८ टक्के इतकी मोठी होती. त्याच वेळी व्यापक बाजाराचे प्रतिनिधित्व करणाऱ्या निफ्टी मिडकॅप १०० मधील घसरण ३.१ टक्के आणि निफ्टी स्मॉलकॅप २५० मध्येही ३ टक्क्यांची घसरण दिसून आली.
बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकानेही जवळपास ३.५ टक्क्यांचे नुकसान सोसले. शुक्रवारी सप्ताहअखेर ८९० अंशांच्या घसरणीने सेन्सेक्सने केली आणि त्यात सोमवारच्या आणखी १,१९० अंशांची भर पडली.
सुमारे २,१०० अंशांच्या या सलग पडझडीने तब्बल ११.४४ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक मत्ता मातीमोल झाली आहे. शुक्रवारच्या बाजार घसरगुंडीत गुंतवणूकदारांचे ४.६५ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले होते, त्यात सोमवारच्या ६.७९ लाख कोटी रुपयांची भर पडली.