Health News : परदेशात विकसित कोविशील्डपाठोपाठ आता कोरोनावरील भारतीय लस कोव्हॅक्सिनची सुरक्षितता वादात अडकली आहे. कोव्हॅक्सिन घेणाऱ्या ३० टक्के लोकांवर दुष्परिणाम झाल्याचे समोर आले आहे.
या लोकांमध्ये श्वसनाशी संबंधित संसर्ग, रक्ताच्या गुठळ्या होणे आणि त्वचेशी संबंधित विकार आढळले आहेत. प्रामुख्याने युवा वर्ग आणि एखादी अॅलर्जी असलेल्या लोकांवर दुष्परिणाम अधिक आढळले.
बनारस हिंदू विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी यासंदर्भात केलेले संशोधन ‘स्प्रिंगर नेचर’ नामक नियतकालिकात प्रकाशित करण्यात आले आहे. भारत बायोटेकने विकसित केलेल्या कोव्हॅक्सिनमुळे ‘अॅडव्हर्स इव्हेंट स्पेशल इंटरेस्ट’ अर्थात एईएसई दुष्परिणाम झाल्याचे संशोधकांनी आपल्या अभ्यासाअंती म्हटले आहे.
ब्रिटिश औषध उत्पादक कंपनी अॅस्ट्राझेनेकाने आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठाने विकसित केलेल्या कोविशील्ड लसीमुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होणे आणि प्लेटलेट्स कमी होणे, यासारखे काही गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात, अशी माहिती नुकतीच समोर आली होती . अॅस्ट्राझेनेकानेच ब्रिटिश न्यायालयात याबाबत कबुली दिली होती. त्यानंतर कोव्हॅक्सिनच्या दुष्परिणामांबाबत ही नवी माहिती समोर आली आहे.
संशोधनाचे निष्कर्ष
बनारस हिंदू विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी जानेवारी २०२२ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत सुमारे ९२६ लोकांवर अभ्यास केला. यामध्ये ६३५ किशोरवयीन आणि ३९१ प्रौढ व्यक्तींचा समावेश होता. या सर्वांची लस घेतल्याच्या एका वर्षानंतर तपासणी करण्यात आली. एकतृतीयांश लोकांनी एईएसआयची तक्रार केली. या लोकांना त्वचेशी संबंधित विकार, श्वसनाचा संसर्ग असे त्रास झाले.
५० टक्के लोकांनी श्वसनाशी संबंधित संसर्गाचा त्रास झाल्याची तक्रार केली. ४७.९ टक्के किशोरवयीन, तर ४२.६ टक्के प्रौढांनी श्वसनमार्गातील संसर्गाच्या समस्येची तक्रार केली. किशोरवयीनांमध्ये त्वचेशी संबंधित विकार (१०.५ टक्के), सामान्य विकार (१०.२ टक्के) मज्जासंस्थेचे विकार (४.७ टक्के) आढळून आले.
प्रौढांमध्ये सामान्य विकार (८.९ टक्के), स्नायू- सांधेदुखी (५.८ टक्के), मज्जासंस्थेचे विकार (५.५ टक्के) होते. अभ्यासात सहभागी झालेल्या महिलांपैकी ४.६ टक्के महिलांना मासिक पाळीत अनियमितता आढळून आल्याचे अहवालात म्हटले आहे. हे दुष्परिणाम अधिक सविस्तरपणे समजून घेण्यासाठी अधिक काळ अभ्यासाची गरजही शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.