Ahmednagar Crime : महाविद्यालयीन युवतीला फसवून तिच्यासोबत अत्याचार करून जबरदस्तीने लग्न केल्याची घटना तालुक्यातील पठार भागात नुकतीच उघडकीस आली. अत्याचार करणाऱ्याच्या अगोदरच लग्न झाल्याचे लक्षात आल्याने संतप्त झालेल्या पीडित युवतीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
त्यावरुन पोलिसांनी कुरकुंडी येथील एका युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर तालुक्यातील पठार भागात राहणारी एक १९ वर्षीय विद्यार्थीनी मामाकडे राहत होती.
ती संगमनेर येथील एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. तिची इंस्टाग्राम वरून आरोपी युवकासोबत ओळख झाली. इंस्टाग्रामवर त्या दोघांमध्ये संभाषण व्हायचे. शनिवारी ती महाविद्यालयात जाण्यासाठी निघाली असता हा युवक दुचाकीवर आला. दुचाकी वरून दोघे जुन्नर तालुक्यातील एका गावात गेले.
या ठिकाणी त्याने या युवतीवर अत्याचार केला. त्यानंतर माझ्याशी लग्न केले नाही, तर मी जीव देईल, अशी धमकी दिली. त्यानंतर त्यांनी आळंदी येथे लग्न केले. लग्न झाल्यानंतर ते कुरकुंडी गावाला आले. घरी आल्यानंतर त्याचे लग्न झाले असल्याचे तिला समजले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने आपल्या घरच्यांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला.