१० जानेवारी २०२५ श्रीगोंदा : तालुक्यातील आरणगाव दुमाला येथील ७८ वर्षाच्या गणपत बजाबा शिंदे यांना शेतीच्या कारणातून दगडाने मारहाण करून जीवे ठार मारल्या प्रकरणी शिवराम मारुती शिंदे (वय ५५ वर्षे) याला श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी जन्मठेप तसेच ५००० रूपये दंड अशी शिक्षा सुनावली.सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता पुष्पा कापसे यांनी काम पाहिले तर मूळ फिर्यादी तर्फे अॅड. सुनील भोस यांनी काम पाहिले.
या बाबत अधिक माहिती अशी शिवराम शिंदे आणि मयत गणपत शिंदे यांचे शेत शेजारी शेजारी होते. त्यांच्यात रस्त्याच्या करणावरून वाद झाला होता. तहसीलदार श्रीगोंदा यांच्याकडे रस्त्याच्या प्रकरणावर कारवाई चालू होती.दरम्यान दि.१३ सप्टेंबर २०२३ रोजी तहसीलदार व महसूल कर्मचारी रस्ता पाहणी करण्यासाठी आले असता शिवराम शिंदे याने त्यांना माझ्या हद्दीतून जायचे नाही असे सांगितले.
तहसीलदार श्रीगोंदा हे रस्ता पाहणी करून निघुन गेले.त्यावेळी आरोपी शिवराम शिंदे याने मयत मयत गणपत शिंदे यांना शिवीगाळ करुत तुला पाहुन घेतो असा दम देत तेथून निघुन गेला.त्यानंतर दि.२५ सप्टेंबर २०२३ रोजी मयत गणपत शिंदे हे सकाळी १० वाजता जनावरे चारण्यासाठी शेताशेजारील डोंगरावर गेले होते.
तर त्यांचा मुलगा देखील गायी घेवून डोंगराकडे गेला.संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास आरोपी शिवराम मारुती शिंदे याने मयत गणपत शिंदे यांना दगडाने मारहाण सुरू केली.वडील ओरडु लागल्याने त्यांना वाचविण्यासाठी फिर्यादी हे डोंगरावरून खाली येऊ लागले मात्र तो पर्यंत शिवराम मारती शिंदे याने फिर्यादी यांच्या वडीलांना दगडाने मारून त्यांचा खून करून तळाईच्या डोंगराच्या बाजूने पळून गेला.
फिर्यादी मुलाने बेलवंडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यानंतर संपूर्ण घटनेचा तपास झाला व न्यायालयात दोषारोप दाखल झाले.सदरचा खटला श्रीगोंदा येथील जिल्हा जिल्हा न्यायाधिश मुजीब शेख यांच्यासमोर चालला सरकार पक्षाच्या वतीने एकूण १२ साक्षीदार तपासले.त्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार फिर्यादी तसेच डॉक्टर, नायब तहसीलदार मिलींद जावध, एस.पी. ऑफिस मधील आवक-जावक क्लार्क वैशाली सकट तसंच तपासी अधिकारी ए.पी चाटे व पी.ए.एफ गजरे यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील पुष्पा कापसे / गायके यांनी कामकाज पाहिले.
या प्रकरणी सरकारी वकिलांनी केलेला युक्तीवाद व न्यायालयासमोर आलेला पुरावा ग्राह्य धरून श्रीगोंदा येथील जिल्हा न्यायाधीश मुजीब शेख यांनी जन्मठेप तसेच ५ हजार दंड अशी शिक्षा सुनावली.सरकार पक्षा तर्फे म.हे कॉ. सुजाता गायकवाड तसेच महिला हेड कॉन्स्टेबल आशा खामकर यांनी सहकार्य केले.
खुनाचा गुन्हा घडल्याची माहिती समजताच तत्कालीन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी करत फरार आरोपीला पकडण्यासाठी पोलिस पथक पाठवत अवघ्या दोन तासात तालुक्यातील उक्कडगाव परिसरात आरोपीचा पाठलाग करत त्याला ताब्यात घेतले होते.