Ahmednagar Breaking : एटीएम मशीन बोलेरोला दोराने बांधून लंपास केल्याची व त्यातील हजारो रुपये लांबवल्याची घटना घडली. पुढील ४८ तासात अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेने एटीएम मशीन चोरणारी टोळी जेरबंद केली.
भरत लक्ष्मण गोडे, सुर्यभान उर्फ काळ्या लक्ष्मण गोडे, अशोक रघुनाथ गोडे, सुयोग अशोक दवंगे, अजिंक्य लहानु सोनवणे असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी आरोपींकडून १ लाख ४२ हजार रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली बोलेरो गाडी, मोबाईल व तुटलेले एटीएम असा ७ लाख ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अकोले तालुक्यातील समशेरपूर फाटा येथील आदिवासी सहकारी सोसायटी कॉम्प्लेक्सच्या गाळ्यामधील एटीएम चोरी झाले होते. ही घटना २३ डिसेंबरच्या रात्री घडली होती. चोरटयांनी एटीएम मशिनला दोरखंड बांधून ती मशिन बोलेरो गाडीने बाहेर ओढून काढली व घेऊन फरार झाले.
नितीन सखाराम पाटील यांनी याबाबत अकोले पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते.
आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि हेमंत थोरात, पोहेकॉ बबन मखरे, दत्तात्रय गव्हाणे, मनोहर गोसावी आदींचे पथक तयार करून तपास सुरु केला. या पथकाने समशेरपूर परिसरामध्ये जाऊन परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज तपासले.
पोनि दिनेश आहेर यांना हे एटीएम मशिन भरत लक्ष्मण गोडे (रा तिरडे, ता.अकोले) याने त्याच्या साथीदारांसह पळवल्याचे कळले. पथकाने तो असलेल्या ठिकाणी जात कारवाई केली. पथकाने यावेळी वरील पाच आरोपींना ताब्यात घेतले.
त्यांनी गणेश लहू गोडे याच्यासह गुन्हा केल्याची कबुली दिली. यातील आरोपी भरत लक्ष्मण गोडे हा रेकॉर्डवरील आरोपी असून त्याच्यावर घरफोडी व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. अधिक तपास अकोले पोलीस करत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर आदींच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.