अहमदनगर Live24 टीम, 25 एप्रिल 2022 Ahmednagar Crime :-उडपी सेंटरवर डोसा खाण्यासाठी आलेल्या ग्राहकांची चटणी खराब असल्याची तक्रार ऐकून उडपी सेंटरचा मालक संतापला.
त्यांना दुसरा डोसा देण्याऐवजी त्यांच्यावर हल्ला केला. डोसा खायला गेलेल्या दोघा मित्रांवर मार खाऊन गंभीर जखमी होण्याची वेळ आली.
२०१७ मध्ये नगर शहरातील चौपाटी कारंजा येथे घडलेल्या या घटनेचा आता निकाल लागला आहे. ग्राहकांवर हल्ला करणाऱ्या उडपी सेंटर चालक बाप-बेट्यांना न्यायालयाने तुरुंगाची हवा खायला पाठविले आहे.
आरोपी किशोर संजय भागानगरे (वय३३), अक्षय संजय भागानगरे (वय २८) व संजय दत्तात्रय भागानगरे (वय ५६ सर्व रा. कुंभारगल्ली, नालेगाव) यांना न्यायालयाने आरोपींना तीन वर्षे सक्तमजुरी व एकूण पाच हजार रुपये दंड अशी शिक्षा दिली.
चौपाटी कारंजा येथे भागानगरे यांचे उडपी सेंटर होते. ८ सप्टेंबर २०१७ च्या रात्री अतुल सुभाष वाघचौरे व त्यांचा मित्र धीरज भगवान रोहोकले हे दोघे भागानगरे यांच्या सिध्देश्वर उडपी सेंटर या गाडीवर स्पंज डोसा खाण्यासाठी गेले होते.
स्पंज डोसा खात असताना त्या दोघांनी बटाटयाची चटणी खराब असल्याचे दुकानदार भागानगरे यांना सांगितले. स्वत: चव घेऊन खात्री करण्यास सांगितले.
भागानगरे याला याचा राग आला. “मी काय तुझा उष्टा डोसा खाऊ काय?” असे भागानगरे म्हणाला. त्यावर वाघचौरे यांनी “तुझ्याकडे असलेल्या डोशातील चटणी खा, मग तुझ्या लक्षात येईल,” असे सांगितले.
याचा आरोपी भागानगरे याला राग आला. किशोर भागानगरे याने त्याच्या हातातील लोखंडी उलातणे (कवचा) फिर्यादीच्या डोक्यात मारले. तेथे उपस्थित इतर आरोपीही धावून आले.
त्यांनी लाकडी दांडक्याने वाघचौरे आणि त्याच्या मित्रालाही मारहाण केली. आरोपी अक्षय हा तर नाष्टा सेंटरच्या गाडीमध्ये ठेवलेली तलवारच घेऊन आला.
वाघचौरे यांचा मित्र धिरज याच्या डोक्यावर त्याने तलवारीने वार केला. या खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायलयात झाली. सरकार पक्षाच्या वतीने अतिरीक्त सरकारी वकील पुष्पा कापसे-गायके यांनी कामकाज पाहिले.
मूळ फिर्यादीतर्फे अॅड. सुहास टोणे व पैरवी अधिकारी एम.ए. थोरात यांनी सहकार्य केले. सरकार पक्षाच्या वतीने आठ साक्षीदार तपासण्यात आले. त्यामध्ये फिर्यादी, जखमी, पंच साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी व तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्वाच्या ठरल्या.