अहमदनगर क्राईम

Ahmednagar Crime News : जबरी चोरीप्रकरणी दोघे गजाआड

Ahmednagar Crime News : शेतवस्तीवरील घराचा दरवाजा उचकटून जबरी चोरी करणारे दोघे जेरबंद करण्यात आले आहे. अनिकेत विलास हुलावळे (रा. गाड्याचा झाप, पळशी, ता. पारनेर) व गणमाळ्या संदल चव्हाण (रा. वासुंदे, ता. पारनेर) असे गजाआड करण्यात आलेल्या दोघा आरोपींची नावे आहेत.

या प्रकरणातील कबीर उर्फ कबऱ्या काळे, अक्षय काळे (दोघे रा. सुरेगाव, ता.श्रीगोंदा) व साईनाथ जाधव (रा. घोसपुरी, ता.नगर) हे तिघे पसार झाले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून, त्यांच्याकडून २ लाख ४० हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पळशी येथील प्रभाकर अण्णा गागरे हे पडवीत झोपले असता ४ इसमांनी लोखंडी सळईने ग्रीलचा दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. सळईने मारहाण करत २ लाख १० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरुन नेला.

त्यात सोन्याचे दागिने, मोबाईल, फोन व रोकड आदी वस्तूंचा समावेश होता. या प्रकरणी पारनेर पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३९४, ३४२, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता. १७ नोव्हेंबरला हा गुन्हा दाखल असून, गुन्ह्याचा तपास एलसीबीच्या पथकाने वेगाने फिरविला.

अनिकेत हुलावळे यास टाकळी ढोकेश्वर येथून ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने इतर साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याचे कबूल केले. गणमाळ्या संदल चव्हाण यास अटक करण्यात आली असून, कबीर काळे, अक्षय काळे व साईनाथ जाधव हे तिघे पसार आहेत.

जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. दिनेश आहेर, पोसई सोपान गोरे, सफौ. भाऊसाहेब काळे, पोहेकॉ. दत्तात्रय हिंगडे, मनोहर गोसावी, बापूसाहेब फोलाने, अतुल लोटके, देवेंद्र शेलार, पोना. रविंद्र कर्डिले, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, पोकॉ. मच्छिंद्र बर्डे, आकाश काळे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, उमाकांत राठोड, अरुण मोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts