Ahmednagar News : शेती वाटपाच्या कारणावरून सतत भांडण करणाऱ्या मुलाच्या त्रासाला कंटाळून वडिलांनी मुलाचा खून केल्याची घटना नेवासा तालुक्यातील गोधेगाव येथे मंगळवारी (दि.१४) मे रोजी सायंकाळी ५.३० वाजता घडली आहे. याप्रकरणी नेवासा पोलिसांनी आरोपी वडिलांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
याबाबत नेवासा पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आरोपी दादासाहेब जाधव व त्यांची पत्नी अलका जाधव हे गोधेगाव येथे घरी पत्र्याच्या शेडमध्ये राहात असताना (दि.१४) मे रोजी सायंकाळी पाच वाजता त्यांचा मुलगा शिवाजी हा दारू पिऊन आला. शेती वाटणीच्या कारणावरून तो वडील दादासाहेब व अलका यांना शिवीगाळ करू लागला.
तुमच्या नावावरील शेती माझ्या नावावर करून द्या. तुम्ही येथे राहू नका. जनावरे बांधू नका. नाही तर तुम्हाला जीवे ठार मारीन, अशी धमकी देऊन त्याने दादासाहेब यांना मारहाण करायला सुरुवात केली. तेव्हा अलकाबाई मध्ये आल्या. शिवाजी याने आई अलका यांना बाजूला लोटले. त्यानंतर शिवाजी याने लाकडी काठी घेऊन वडील दादासाहेब यांना पुन्हा मारहाण करायला सुरुवात केली.
तेव्हा दादासाहेब यांनी शेड मधील लाकडी फळी मुलगा शिवाजी याच्या डोक्यात मारली. फळीचा मार बसताच शिवाजी यांच्या डोक्यातून रक्तस्राव सुरू झाला. दादासाहेब यांना देखील मुक्का मार लागला असल्याने ते पत्नी अलकाला घेऊन मुलगी कविता हिच्याकडे नेवासा तालुक्यातील बेलपांढरी येथे गेले. त्यानंतर दादासाहेब यांनी दुसऱ्या दिवशी नेवासा पोलीस स्टेशनला मुलगा शिवाजी विरुद्ध तक्रार दिली.
शुक्रवार (दि.१७) मे रोजी सायंकाळी साडेपाच वाजता गावातील रामेश्वर शेलार यांनी दादासाहेबांची मुलगी कविता हिच्या मोबाईलवर फोन करून शिवाजी हा पत्र्याच्या शेडमध्ये मयत अवस्थेत असल्याचे सांगितले.
तेव्हा दादासाहेब व त्यांची पत्नी अलका हे दोघे पुन्हा गोधेगावला गेले. तेथे त्यांना शिवाजी मयत अवस्थेत आढळून आला. याबाबत त्यांनी नेवासा पोलीस स्टेशनला खबर दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून शवविच्छेदन केले.
त्यानंतर अलका जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दादासाहेब सारंगधर जाधव यांच्याविरुद्ध नेवासा पोलिसांनी मुलगा शिवाजी जाधव यांच्या खून प्रकरणी ‘भादवि कलम ३०२ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
तसेच वडील दादासाहेब यांना अटक देखील केली आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांनी घटनास्थळाला भेट दिली. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्रसिंग ससाणे करीत आहेत.