Ahmednagar Crime : जमिन विक्रीचे राहिलेले पैसे वडिलांना न देता आम्हाला द्या, असे म्हणून नऊ जणांनी रियाज़ सय्यद यांच्या घरात घुसून त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. ही घटना राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे (दि. ९) सप्टेंबर २०२३ रोजी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रियाज बक्षु सय्यद (वय ४३, रा. कानडगाव, ता. राहुरी) यांनी राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, रियाज सय्यद यांचा भाऊ असीफ बक्षु सय्यद याने गावातील दिलदार अहमद सय्यद यांची जमीन ४ लाख रुपये किंमतीला विकत घेण्याचा व्यवहार केलेला असून त्या व्यवहाराचे विसारा पोटी त्याने दिलदार सय्यद याला २ लाख रुपये दिलेले आहेत.
परंतु दिलदार सय्यद याचा मुलगा सादीक दिलदार सय्यद व सून आमरीन सादीक सय्यद हे माझा भाऊ याला उरलेले पैसे दिलदार यांना न देता आम्हाला दे म्हणुन सतत पैशाची मागणी करतात.
असीफ सय्यद याने तुम्हाला पैसे देणार नाही, मी दिलदार सय्यद यांनाच पैसे देणार, असे म्हणुन त्यांना पैसे देण्यास नकार देतो. (दि.९) सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी १.३० वाजेच्या सुमारास रियाज सय्यद हे घरी असताना आरोपी सादीक दिलदार सय्यद, आमरीन सादीक सय्यद व सादीक याची मेहुणी, यास्मीन सय्यद (सर्व रा. कानडगाव ता. राहुरी) तसेच इतर अनोळखी ६ पुरुष रियाज सय्यद यांचा घरात अनाधिकाराने घुसले.
आणि जमीनीच्या व्यवहाराचे राहीलेले पैसे वडीलांना न देता आम्हाला द्या. असे म्हणून रियाज सय्यद व त्यांच्या कुटुंबीयांना शिवीगाळ करून मला लाथाबुक्क्याने मारहाण केली. तसेच रियाज सय्यद यांच्या पत्नीच्या गळ्यातील अंदाजे ५० हजार रुपये किंमतीचे २ तोळ्याचे सोन्याचे गंठण काढुन घेतले.
आणि घरातील १२ हजार रुपये किंमतीचा मोबाईल घेऊन गेले. जाताना सर्वांना जीवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर रियाज बक्षु सय्यद यांनी राहुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी सादीक दिलदार सय्यद, आमरीन सादीक सय्यद, यास्मीन सय्यद (सर्व रा. कानडगाव, ता. राहुरी) यांच्यावर मारहाण व धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.