Ahmednagar Crime : रात्रीच्या वेळी घराचा दरवाजा कशाच्या तरी सहाय्याने उघडून घरात प्रवेश करत झोपलेल्या युवकाच्या हातावर ब्लेडने ओरखडे ओढत त्याला जीवे मारण्याची धमकी देत त्याच्या पाकिटात असलेली २ हजारांची रोकड ३ चोरट्यांनी पळवून नेल्याची घटना नगर तालुक्यातील नांदगाव येथे घडली.
याबाबत सदर युवकाचे वडील शिवाजी जगन्नाथ पुंड ( रा. पाण्याच्या टाकीजवळ, नांदगाव ता. नगर) यांनी सोमवारी (दि. ४) दुपारी एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना रविवारी (दि. ३) रात्री ११.३० च्या सुमारास घडली आहे.
फिर्यादी पुंड यांचा मुलगा ओंकार घरात झोपलेला असताना अनोळखी ३ चोरटे घरात घुसले. त्यांनी मुलाच्या हातावर ब्लेडने ओरखडे ओढत त्याला जीवे मारण्याची धमकी दिली. त्याच्याकडे पैशांबाबत विचारणा केली.
त्यावेळी घाबरलेल्या ओंकार याने किचनमधील रॅकवर पैशांचे पाकीट असल्याचे सांगितले. या चोरट्यांनी किचनचा दरवाजा उघडून तेथील पैशांचे पाकीट पळवून नेले. या पाकिटात २ हजार रुपये होते असे या फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात ३ चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.