नगर अर्बन घोटाळाप्रकरणी आणखी एकाला आर्थिक गुन्हे शाखेने रविवारी (दि. ४) पहाटे अटक केली. अविनाश प्रभाकर वैकर (वय ६३, रा. सोनानगर चौक, सावेडी, अहमदनगर) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. अटक केलेल्या कर्जदार उद्योजकाने बँकेकडून कर्ज घेतलेल्या रकमेतून काही रक्कम मुदत ठेव म्हणून ठेवल्याचे तपासात समोर आले. दरम्यान, आरोपीला न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.
नगर अर्बन कर्ज घोटाळाप्रकरणी अटक केलेल्या आरोपी अविनाश प्रभाकर वैकर यासह सोमवारी (दि. ४) न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी पोलिसांकडून गुन्ह्याच्या तपासाची माहिती देण्यात आली. सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. मंगेश दिवाणे यांनी बाजू मांडली. आरोपीने मेसर्स एव्हीआय इंजिनिअरिंग वर्क्स नावाच्या व्यवसायासाठी २ कोटी ६७ लाखांचे कर्ज घेतले. यातील काही रक्कम दुसऱ्या बँकेचे कर्ज घेण्यासाठी वापरले.
काही रक्कम स्वतःच्या नावे मुदत ठेव म्हणून ठेवली, तर काही रक्कम रोख स्वरूपात काढली. याशिवाय कर्ज रकमेतून ६९ लाख रुपये ६० हजार रुपये कर्जदार पन्नालाल बगाडीया यांच्या खात्यावर वर्ग केली असून, हा व्यवहार संशयास्पद आहे. कर्जाचा गैरवापर करून पैशाची विल्हेवाट कशी लावली, याबाबत चौकशी करण्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी पोलिसांकडून करण्यात आली होती.
या घोटाळ्याचा तपास शहर विभागाचे पोलिस उपाधीक्षक अमोल भारती यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. अमोल भारती यांनी आरोपींचा शोध घेण्याची मोहीम सुरू केली आहे. ही कारवाई पोलिस उपाधीक्षक भारती यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिस उपनिरीक्षक निसार शेख, मोरे, सुयोग सुपेकर, महेश मगर, हेमंत खंडागळे, सोनाली भागवत, योगेश घोडके, मुकेश क्षीरसागर आदींच्या पथकाने केली.
पाण्याच्या टाकीत बसला लपून ?
पोलिस उपअधीक्षक भारती यांच्या मार्गदर्शनाखालील पोलिसांचे पथक रविवारी पहाटे (दि. ४) आरोपी राहत असलेल्या सोनानगर येथील सुदर्शन अपार्टमेंटमध्ये दाखल झाले. परंतु आरोपी घरात मिळून आला नाही. पलीकडे विचारपूस केली असता, समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
आरोपी टेरेसवर लपून बसल्याचा पोलिसांना संशय आला. त्यामुळे टेरेसवर जाऊन शोध घेतला असता, हा पाण्याच्या टाकीत मिळून आला, अशी माहिती पोलिस सूत्रांनी दिली असल्याची चर्चा आहे असे वृत्त एका मीडियाने दिले आहे.