१० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : पती जितेंद्र चव्हाण व पुतण्या रोहन चव्हाण यांच्यावर ९ डिसेंबर रोजी कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आलेला गुन्हा खोटा असून तो रद्द करण्यात यावा असे निवेदन पत्नी अनिता जितेंद्र चव्हाण यांनी पोलीस अधीक्षक यांना दिले आहे.
अनिता चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,माझे पती जितेंद्र चव्हाण व पुतण्या रोहन चव्हाण यांच्यावर कोतवाली पोलीस स्टेशनला दाखल झालेला गुन्हा हा खोटा आहे.७ नोव्हेंबर रोजी तोफखाना पोलीस स्टेशनला दाखल मारहाणीच्या गुन्ह्यात मी व पुतण्या रोहन साक्षीदार आहोत.
सदर गुन्हा मागे घेण्यासाठी माझ्या पतीवर आरोपींकडून दबाव येत होता.तसेच रोहन यास वारंवार धमक्या देण्यात येत होत्या.याबाबत रोहन याने १८ नोव्हेंबर रोजीच एन.सी. दाखल केलेली आहे.माझ्या कुटुंबाला निर्माण झालेल्या धोक्याबाबत पती जितेंद्र चव्हाण यांनी १९ नोव्हेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन देखील दिलेले आहे.
तसेच पुतण्या रोहन चव्हाण यांनी २१ नोव्हेंबर रोजी अर्ज केलेला आहे.यावर काहीही कारवाई झाली नसल्याचा आरोप अनिता चव्हाण यांनी निवेदनात केला आहे.आमच्यावर वारंवार दबाव टाकून देखील संबंधितांना दाद दिली नाही.त्यामुळे माझे पती व पुतण्या यांच्यावर ९ डिसेंबर रोजी कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये खोटा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हा खोटा असल्याबाबतचे पुरावे पोलीस स्टेशनला देण्यात आले आहेत.गुन्हा दाखल झाला त्यावेळेसचे पती जितेंद्र चव्हाण व पुतण्या रोहन याचे मोबाईल लोकेशन, तसेच घटनेच्या वेळेसचे सीसीटीव्ही फुटेज याबाबतचा पंचनामा देखील झालेला आहे.
खोटा गुन्हा दाखल करण्याबाबतचा कट रचल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे.तसेच फिर्यादी सोबत पोलीस स्टेशनला कोण कोण होते याचे पुरावे कोतवाली पोलीस स्टेशनला दिलेले आहेत.तरी पती जितेंद्र चव्हाण व रोहन चव्हाण यांच्यावरील खोटा गुन्हा मागे घेण्याची विनंती निवेदनामध्ये करण्यात आली आहे.