Ahmednagar City News : शहरातील तोफखाना हद्दीत मटका, जुगार, बिंगो, हुक्का, अवैध दारू, गांजा अशा अवैध धंद्यांचा सुळसुळाट वाढला असून त्यामुळे गुन्हेगारी फोफावत चालली आहे, रात्री अपरात्री शहरात सर्रासपणे युवकांचा वावर यावर पोलीस प्रशासानाची कुठली कारवाई नसल्याने गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहे.
याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांवर होत असून हे विद्यार्थी देखील आता गुन्हेगारीकडे वळू लागले आहे. कोणाचीही भीती न बाळगता विद्यार्थी खुलेआम धारदार शस्त्रांचा वापर करत आहे, यावर आळा घालण्यासाठी आ.संग्राम जगताप यांनी २० दिवसांपूर्वी पोलीस अधीक्षक यांची भेट घेवून निवेदन देऊन चर्चा केली.
मात्र यावर अद्याप कुठलीच उपाययोजना झालेली दिसत नाही. तोफखाना पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंदे आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढले असून पोलीसांचा कुठल्याही प्रकारे वचक राहिला नाही.
राष्ट्रवादी पक्षाच्या शिष्टमंडळाने शहरातील तोफखाना हद्दीतील अवैध धंद्याचा पर्दाफाश करत याचे पुरावे अप्पर पोलिस अधीक्षकांकडे सादर केले. याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनातून तक्रार केलेली आहे.
अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे यांनी शिष्टमंडळास सांगितले की, पोलीस प्रशासन नगर शहरात कायदा सुव्यवस्था व शांतता अबाधित ठेवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करत आहे. पोलीस अधीक्षक हे देखील रात्री उशिरापर्यंत शहरात रस्त्यावर फिरून कारवाई करत आहे.
पालकांनी देखील आपल्या पाल्यांकडे जातीने बारकाईने लक्ष देणे गरजेचे आहे. आपली मुलं शहरात रात्री-अपरात्री तसेच बिनकामाची का फिरतात याकडे लक्ष द्यावे.
पालकांनी मुलांकडे चौकशी करावी, गुन्हेगारीमुळे आपल्या मुलाचे आयुष्य बदनाम होवून बरबाद होईल हे टाळण्यासाठी नागरिकांनी जागरूक राहून पोलिसांना सहकार्य करावे, असे ते म्हणाले.