Ahmednagar News : पाथर्डी तालुक्यातील तिसगाव येथील इंदिरानगर परिसरात शनिवारी पहाटे काही महिलांचे ड्रोनद्वारे चित्रीकरण केल्याप्रकरणी अमोल भाऊसाहेब भडके, नंदू नामदेव लोखंडे , वाल्मिकी राजाराम गारुडकर (सर्व रा.तिसगाव ) व कृष्णा नंदू (रा. शिरापूर, ता. पाथर्डी) यांच्या विरोधात पोलिसात जातीवाचक शिवीगाळ, जीवे मारण्याची धमकी व अँट्रॅसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबतची माहिती अशी की, तिसगाव येथील इंदिरानगर परिसरात शनिवारी पहाटे महिलांचे या तरुणांनी ड्रोनद्वारे शूटिंग काढली. याबाबत महिलांनी घरातील लोकांना माहिती दिली.
त्यानंतर पोपट योव्हान शिंदे (रा. तिसगाव वय ४०) यांनी ड्रोनद्वारे शूटिंग करणाऱ्या तरुणाला पकडून त्यास जाब विचारला असता, त्याच्या गाडीतील इतर तिघांसोबत शिंदे यांची शाब्दिक चकमक झाली,
या वेळी पोपट शिंदे यांना या शूटिंग करणाऱ्या चार जणांनी जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत पोपट शिंदे यांनी पाथर्डी पोलिसात फिर्याद दिली आहे.
या घटनेमुळे तिसगावकरांमध्ये मोठा संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित आरोपींवर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी अन्यथा तिसगाव येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा बहुजन समता पार्टीचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव सकट, जिल्हाध्यक्ष शिवाजी बुलाखे, संघटक आबासाहेब दिवटे, सीताराम शिरसाट यांच्यासह समाज बांधवानी दिला आहे.