Ahmednagar Crime : पाच मिनिटांत पैसे डबल करून देण्याच्या आमिषाने तब्बल साडेनऊ लाखांची फसवणूक केली आहे. त्याबदल्यात पेपरची रद्दी असलेली पिशवी दिली. मात्र फोन नंबर व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे लोणी पोलिसांनी तीन आरोपींना शिताफीने नुकतेच गजाआड केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र ममता साठे (वय ३६, रा. वासुंदे, ता. पारनेर), अरुण सुरेश शिंदे (वय २४, रा. वरवंडी फाटा, ता. संगमनेर), अन्वर अब्दूलखा पठाण (वय ४८, रा. मुढवा, पुणे), अशी आरोपींची नावे आहे. त्यांना लोणी पोलिसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून ५ लाख रुपयांची रोकड हस्तगत केली आहे.
याबाबत बाबासाहेब वसंत सूर्यवंशी यांनी फिर्याद दाखल केली आहे. सध्या कुठल्याही राष्ट्रीय बँकेत अथवा पतसंस्थेत किमान ६ वर्षे आधी रक्कम दामदुप्पट होत नाही, मात्र पाच मिनिटांत रक्कम दुप्पट कशी होणार याची कुठलीही शहानिशा न करता सध्या जास्तीच्या हव्यासापोटी अनेक जण अशा फसवणूकीस बळी पडतात. असाच काहीसा प्रकार लोणीत नुकताच उघडकीस आला आहे.
सदर घटनेतील सराईत आरोपीने बनावट नाव सांगून फिर्यादीस फोन करून लोणी येथे बोलाविले. त्यांना पाच मिनिटांत पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखविले. त्यास आरोपी बळी पडला आणि त्याने तब्बल साडेनऊ लाख रुपये आरोपीस दिले. त्या बदल्यात पेपरची रद्दी असलेली बॅग देऊन फसवणूक करीत पलायन केले.
या घटनेनंतर आरोपीने फसवणूक झाल्याने लोणी पोलिसांत धाव घेतली. लोणी पोलिसांनी प्रथम फोन लोकेशन व परिसरातील सीसीटिव्ही फुटेज तपासले. यासाठी एक पथक तयार केले व आरोपींच्या शिरूर येथून मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडे असलेली ५ लाखांची रोख रक्कम ताब्यात घेण्यात आली.
ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक स्वाती भोर, शिर्डीचे पोलीस उपअधिकारी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली लोणीचे सहाय्यक पोलीस निरिक्षक युवराज आठरे,
पोलीस उपनिरिक्षक योगेश शिंदे, पो.कॉ. जोसेफ साळवी, पो.कॉ. दहिफळे, पो.ना. सय्यद, पो.कॉ. पवार यांनी कामगिरी केली. याबाबत लोणी पोलीस ठाण्यात ३ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.