अहमदनगर क्राईम

दरोडा टाकण्यापूर्वीच आवळल्या मुसक्या; सहा आरोपींकडे सापडला शस्त्र साठा

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2022 Ahmednagar Crime :- गावठी कट्टा, तलवार, कोयता, मिरची पुड घेऊन दरोडा घालण्याच्या तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला पोलिसांनी अटक केली.

सुनिलसिंग जितसिंग जुन्नी (वय 27), आझाद लक्ष्मण शिंदे (वय 23), शंकर अशोक पंडित (वय 32), सागर दिनेश बिनोडे (वय 26), आकाश अगस्तीन आढाव (वय 22 सर्व रा. संजयनगर, काटवन खंडोबा, अहमदनगर) व संतोष रमेश पंडित (वय 25 रा. आगरकर मळा, स्टेशन रोड, अहमदनगर

) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

अहमदनगर शहरातील रेल्वेस्टेशन परिसरात आगरकर मळा ते गायके वस्ती रोडवरील रेल्वेब्रिजखाली कोतवाली पोलिसांनी ही कारवाई केली. दरम्यान आरोपींकडे मोठ्या प्रमाणात शस्त्र आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

पोलीस शिपाई अतुल काजळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वेस्टेशन परिसरात ब्रिजखाली काही इसम धारधार शस्त्रे व इतर साहित्य घेऊन दरोडा घालण्याच्या उद्देशाने एकत्रित जमले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संपत शिंदे यांना मिळाली होती.

निरीक्षक शिंदे यांच्यासह उपनिरीक्षक मनोज महाजन, पोलीस अंमलदार यांच्या पथकाने रेल्वेब्रिज परिसरात जावून छापा टाकला असता दुचाकीवर पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या सहा आरोपींना अटक केली.

त्यांच्याकडून स्टीलचा कट्टा, एक मॅगझीन, एक जिवंत काडतुसे, तीन दुचाकी, एक लोखंडी चाकू, रोख रक्कम, मिरची पावडर, स्प्रे बॉटल, दोन लोखंडी तलवारी असा एक लाख 31 हजार 100 रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

अटक करण्यात आलेल्या सहा आरोपींपैकी चार आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्याविरूध्द दरोडा, दरोड्याची तयारी, खूनाचा प्रयत्न, मारहाण, शिवीगाळ, दमदाटी, सरकारी कामात अडथळा, चोरी या कलमान्वये विविध गुन्हे दाखल आहेत.

आरोपी सुनिलसिंग जुन्नी विरोधात नगर जिल्ह्यातील अकोले, एमआयडीसी, बीड जिल्ह्यातील नेकनुर व नाशिक जिल्ह्यातील आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. आरोपी आझाद शिंदे, शंकर पंडित, सागर बिनोडे यांच्याविरूध्द कोतवाली पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.

Ahmednagarlive24 Office

Published by
Ahmednagarlive24 Office

Recent Posts