अहमदनगर क्राईम

शेवगाव येथे परप्रांतीय महिलेचा खून

१० जानेवारी २०२५ शेवगाव : एका परप्रांतीय महिलेचा तिच्या पतीने खून केल्याची घटना शेवगाव शहरात नेहरूनगर (शिवनगर) येथे बुधवारी रात्री घडली.याबाबत पोलिसांनी तिच्या पतीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.शहरातील नेहरूनगर (शिवनगर) येथे एका २९ वर्षांच्या महिलेचा तिचा पती इस्माईल मकसूद मालिक दोघे (रा. मनोहरपूर, मलिकपारा, दनकुनी, जि. हुगळी, पश्चिम बंगाल), याने कौटुंबिक कारणावरून तोंडावर, छातीवर लाथाबुक्यांनी मारहाण करून तिचा खून केल्याची घटना बुधवार दि.८ रोजी रात्री घडली.

खुन केल्यानंतर खुनी पती इस्माईल हा घराला बाहेरून कुलूप ठोकून फरार झाला. याबाबत निर्मला भाऊसाहेब कदम (रा. नेहरूनगर शेवगाव), यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मयुरी गणेश शिंदे यांच्या सांगण्यावरून इस्माईल मलिक व त्याची पत्नी यांना माझी खोली भाड्याने दिली होती.त्या दोघांचे कौटुंबिक कारणावरून सतत भांडणे होत होते.

बुधवार दि.८ रोजी रात्री त्यांचे याच कारणाने भांडण झाले.गुरुवारी सकाळी सुबूद (पूर्ण नाव माहीत नाही) हा माझ्या घरी आला. त्याने सांगितले की, इस्माईल मालिक याने मला फोनवरून आम्हा दोघा नवरा-बायकोचे रात्री भांडण झाल्याने मी माझ्या पत्नीच्या छातीवर, तोंडावर लाथाबुक्यांनी मारहाण केली.

ती उठत नसल्याने मी खोलीला कुलूप लावून निघुन गेल्याचे सांगितले.त्यामुळे फिर्यादी निर्मलाने याची पोलिसांना खबर दिली.पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी दरवाजा तोडला असता,आतमध्ये सदर महिलेच्या नाकातोंडातून रक्त येत असल्याचे दिसून आले.

याबाबत शेवगाव पोलिसांनी इस्माईल मलिक याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला असून, तो फरार असल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत.शेवगाव शहरात शिवनगर भागात अनेक वर्षांपासून वेशा व्यवसायाचे बस्तान आहे.दोन वर्षांपासून येथे परप्रांतीय महिलांना सहारा देण्यात आला आहे.

येथील व्यवसाय बंद करण्याबाबत मंगलसिंग गायकवाड, किरण जाधव यांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत हे व्यवसाय बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले असताना याकडे पोलिसांनी दुर्लक्ष केले.तर याबाबत दोन दिवसांपूर्वी याचिकाकर्त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर ही घटना घडली नसती अशी नागरिक चर्चा करीत आहेत.

Sushant Kulkarni

Published by
Sushant Kulkarni