अहमदनगर क्राईम

पालवे बंधुवर दोन वर्षासाठी तडीपारीची कारवाई ; पाथर्डीचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी काढले आदेश

१० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : अनेक गंभीर गुन्हे दाखल असलेले पाथर्डी पंचायत समितीचे माजी सभापती संभाजी किसन पालवे व त्यांचे चुलत बंधू शहादेव भानुदास पालवे (दोन्ही. रा. कोल्हार, ता. पाथर्डी) यांच्यावर तडीपारच्या कारवाईचे आदेश काढण्यात आले आहेत.

पाथर्डीचे उपविभागीय दंडाधिकारी प्रसाद मते यांनी नुकताचा हा आदेश काढला असून, दोघांना नगर जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे व बीड जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे.

सह्याद्री छावा संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष रावसाहेब काळे यांनी केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.संघटनेच्या वतीने पालवे टोळीची दहशत व गुंडगिरी संपविण्यासाठी तडीपारची मागणी करुन वेळोवेळी आंदोलन व उपोषण करुन पाठपुरावा करण्यात आला होता.

नुकतेच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालया समोर तडीपारच्या प्रस्तावाला विलंब होत असल्याप्रश्नी उपोषण केले होते. या आदेशाने संघटनेच्या वतीने समाधान व्यक्त करुन प्रशासनाचे आभार मानण्यात आले आहे.

हद्दपार करण्यात आलेले संभाजी पालवे व शहादेव पालवे यांना नगर जिल्ह्यासह स्पष्ट करण्यात आलेल्या चारही जिल्ह्याच्या हद्दीत दोन वर्षासाठी जाता येणार नाही.तर इतर जिल्ह्यात राहत असलेल्या रहिवासीच्या ठिकाणा जवळील नजीकच्या पोलीस ठाण्यामध्ये प्रत्येक महिन्यातून एकदा जातीने हजेरी लावावी लागणार आहे.

त्याच्या रहिवासाच्या ठिकाणांमध्ये बदल झालेला असो किंवा नको संबंधित पोलीस स्थानकात हजेरी लावणे आवश्यक असल्याचे पाथर्डीचे उपविभागीय दंडाधिकारी यांनी दिलेल्या आदेशात म्हंटले आहे.

Sushant Kulkarni

Published by
Sushant Kulkarni