Ahmednagar: अहमदनगर ( Ahmednagar) जिल्हयातील कोपरगाव, राहाता तसेच औरंगाबाद जिल्हयात शेतकऱ्यांना (farmers) आणि बांधकाम व्यवसिकांना (builders)कमी भावात सिमेंट आणि स्टील देतो म्हणून अनेकांना लुटणारा आणि मागच्या वर्षांपासून फरार असणाऱ्या एका ठगाला बेळगाव पोलिसांनी (Police) अटक (arrested) केली असल्याची माहिती समोर आली आहे.
या ठगाला मागच्या वर्षांपासून पोलीस आणि खाजगी गुंतवणूकदार शोधत होते. मात्र हा सापडत नव्हता. या ठगाने कोपरगाव तालुक्यात तालुक्यात मागच्या दहा वर्षांपासून आपले वास्तव्य वाढवले आणि तालुक्यातील अनेक बडे शेतकरी तसेच व्यवसायिकांना स्टील व सिमेंट कमी भावात देण्याचे आमिष दाखवत कोट्यवधी रुपये जमा केले आहे.
कोपरगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गाच्या कामाच्या पट्ट्यामध्ये अनेक शेतकर्यांच्या जमिनी व घरे अधिग्रहीत झाले. शेतकर्यांना सरकारकडून चांगल्याप्रकारे मोबदला मिळाला. याचाच फायदा घेत शेतकर्यांना नवीन घरे बांधण्यासाठी तसेच व्यावसायिक बिल्डरांना नवीन वास्तू उभी करण्यासाठी याने सिमेंट व स्टील कमी भावात उपलब्ध करून दिले.
तर काही गुंतवणूकदारांना लाखाचे पाच लाख रुपये करून देतो असे आमिष दाखवत त्यांच्याकडूनही कोट्यवधी रुपयांची माया जमा केली. सुरुवातीला गुंतवणूकदारांना त्याने दुप्पट तिप्पट पैसे दिले तर शेतकरी व बिल्डरांना कमी भावात स्टील व सिमेंट उपलब्ध करून दिले.
अनेकांचा विश्वास त्याने संपादन केल्यानंतर परिसरात आपले जाळे पसरविले. अनेक व्यावसायिकांनी त्याच्याकडे लाख, दहा लाख, कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक केली. आपले टारगेट पूर्ण झाल्यानंतर मग मात्र हा ठग या भागातून पसार झाला.
या ठगाच्या चालकाचा गेल्या वर्षी शोध लागला होता मात्र हा ठग अजूनही गायब होता. अखेर या ठगाचा बेळगाव पोलिसांनी शोध लावला व त्याच्या मुसक्या आवळल्या. या ठगाच्या विरोधात कोपरगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.
याबाबत तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, आम्ही बेळगाव पोलिसांची संपर्क साधला आहे. मात्र त्यांनी फोनवर माहिती दिली नाही. येत्या दोन दिवसांत या ठगाच्या अटकेची माहिती घेऊ व पुढील तपास करू असे सांगितले.