अहमदनगर क्राईम

गुलमोहर रोडवरील कॅफेवर छापा; चालकावर गुन्हा दाखल

१० जानेवारी २०२५ अहिल्यानगर : कॉफी शॉपच्या नावाखाली मुला मुलींना अश्लील चाळे करण्यास जागा उपलब्ध करून देणाऱ्या गुलमोहर रोड वरील पारिजात चौकातील कॅफेवर तोफखाना पोलिसांनी बुधवारी (दि.८ जानेवारी) दुपारी छापा टाकत कारवाई केली. याप्रकरणी कॅफेचालक ओंकार दत्तात्रय कोठुळे (रा. भूतकर वाडी, भिंगारदिवे मळा) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची माहिती अशी की,सावेडी उपनगरात गुलमोहर रोडवर पारिजात चौक येथील हंगरे ला या कॅफेत चहा पाणी अगर खाद्यपदार्थ न ठेवता आत पडदे लावून सोपे बसवून तरुण तरुणींना अश्लील चाळे करण्याकरिता जागा उपलब्ध करून देत असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळाली होती.

या माहितीवरून पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांच्या सूचनेवरून तोफखाना पोलिसांनी त्या ठिकाणी जाऊन खात्री करून छापा टाकला असता त्या ठिकाणी लाकडी कंपार्टमेंट बनवून बाहेरून पडदे लावून आतमध्ये बसण्यासाठी सोपे ठेवून मुला-मुलींना बसण्यासाठी व अश्लील चाळे करण्यासाठी जागा उपलब्ध करून देताना कॅफे चालक ओंकार दत्तात्रय कोठुळे मिळून आला.

पोलिसांनी त्यास कॉफी शॉपचा परवाना मागितला असता त्याच्याकडे कॉफी शॉप चा परवाना नसल्याचे आढळून आले.परवाना नसताना कॉफी शॉपचा बोर्ड लावून कुठलाही कॉफी पेय अगर खाद्यपदार्थ तेथे विक्री करता ठेवलेले नसल्याचे आढळून आले.यावरून पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले.याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात पो.कॉ. राहुल म्हस्के यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ओंकार कोठुळे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sushant Kulkarni

Published by
Sushant Kulkarni