१० जानेवारी २०२५ कोपरगाव : माजी उपनगराध्यक्ष स्वप्निल निखाडे यांनी मंगळवारी सात जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास आपल्या वाहनामध्ये बसून विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि मित्रांनी त्यांना कोपरगाव शहरातील मुळे हॉस्पिटल येथे उपचारार्थ दाखल केले. डॉक्टर मुळे यांनी प्राथमिक उपचार केले परंतु प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी संजिवनीच्या रुग्णवाहिकेतून नाशिकच्या नाईन पल्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.
यावेळी कोल्हे यांच्या यंत्रणेतील कर्मचारी तसेच काळे आणि कोल्हे दोन्ही गटातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मदतीसाठी धावून आले होते. मात्र उपचारा दरम्यान त्यांचा गुरुवारी सकाळी मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले.सन २०१६ च्या कोपरगाव नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत स्वप्निल निखाडे प्रभाग क्रमांक दहा मधून भाजपच्या तिकिटावर निवडून आले होते.
त्यानंतर कोल्हे कुटुंबियांनी निखाडे यांना कमी वयातच उपनगराध्यक्ष पदाची संधी दिली. कमी वयातच उपनगराध्यक्ष पदी विराजमान झालेले निखाडे कोपरगावात अनेकांना परिचित होते. त्यानंतरच्या काळात त्यांनी कोल्हे कुटुंबाची साथ सोडत आमदार आशुतोष काळे यांच्या काळे गटात प्रवेश करत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधले होते.
विधानसभा निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आशुतोष काळे यांना विजयी करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी प्रचार केला.स्वप्निल निखाडे यांनी टोकाचं पाऊल उचलत आत्महत्या का केली ? या संदर्भात शहरात विविध प्रकारच्या चर्चा सुरू असून अधिकृत कारण मात्र समजू शकले नाही.स्वप्निल निखाडे मन मिळाऊ स्वभावाचे असल्याने त्यांच्या जाण्याने कोपरगाव शहरासह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
विष प्राशन करून आत्महत्याचा प्रयत्न केलेले कोपरगाव नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष तथा कोल्हे गटाचे माजी नगरसेवक व राष्ट्रवादीच्या आ. काळे गटाचे कार्यकर्ते स्वप्निल शिवाजी निखाडे (वय-३३) यांचे आज सकाळी १० वाजेच्या सुमारास नाशिक येथे उपचारादरम्यान निधन झाले.