Ahmednagar Crime : राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील आठ दिवसापूर्वी पडलेल्या दरोड्यातील आरोपींना मुद्देमालासह पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा अहमदनगर, राहुरी पोलिसांनी संयुक्त कारवाई करून आरोपींना पकडले आहे.
यातील आरोपी आष्टी, जिल्हा बीड येथील असून या प्रकरणात पाथर्डी येथील एका सुवर्ण व्यवसायिकालाही पोलिसांनी आरोपी केले आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सात्रळ परिसरात गीते वस्ती येथील शिक्षणसेवक गिते यांच्या घरावर दिनांक १४ सप्टेंबर रोजी दरोडा पडला होता.
दरोडेखोरांनी चाकूचा धाक दाखवून दीड लाखाचा ऐवज चोरुन नेला होता. दरोडेच्या घटनेनंतर प्राथमिक तपासात ठिकठिकाणी आरोपींची ठसे मिळाले होते. ते ठसे चालाखीने सुरक्षित करण्याची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू लोखंडे व त्यांच्या पथकाने केली होती.
याच ठशाच्या आधारे आरोपींना आष्टी, बीड येथून पोलिसांनी अटक केली. यामध्ये राम चव्हाण, वय २२ वर्ष, राहणार आष्टी, तुषार भोसले, वय १९, राहणार पिंपरखेड, आष्टी, रियाज शेख, वय ४९, आष्टी या तिघांचा समावेश आहे.
अटक केलेले आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर इतर किती गुन्हे दाखल आहेत याचा तपास आता पोलीस करत आहेत. पोलिसांनी अवघ्या आठ दिवसात आरोपींना जेरबंद केल्याबद्दल पोलिसांचे सोनगाव- सात्रळ पंचक्रोशीत कौतुक होत आहे.