अहमदनगर जिल्ह्यात गुन्हेगारी घटना घडताना दिसतायेत. चोरी, दरोडे, खून आदी घटना होताना दिसतायेत. आता एक भयंकर थरार समोर आला आहे.तिघींना मारून शेतात पुरल्याचा आरोप असणारा, खून प्रकरणात शिक्षा भोगलेला व काही गुन्ह्यांत निर्दोष मुक्त झालेला अकोले तालुक्यातील सुगाव खुर्द येथील सिरीयल मच्छिंद्र उर्फ किलर अण्णा वैद्य हा जमावाच्या हल्ल्यात ठार झालाय.
५८ वर्षीय अण्णा वैद्य याने रविवारी (दि. १०) सायंकाळी एका अल्पवयीन मुलीची छेडछाड केल्याने संतप्त झालेल्या जमावाने त्याच्यावर हल्ला केला. यात तो जखमी झाला. उपचारासाठी त्याला संगमनेर येथे आणले होते परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नेमकी काय घडली घटना ?
रविवारी सायंकाळी अल्पवयीन मुलीची त्याने छेड काढली होती. पीडितेने फिर्यादित म्हटले आहे की, रविवारची सुटी असल्याने पीडित दुपारी मैत्रिणीकडे चालली होती. त्यावेळी अण्णा वैद्य हा त्याच्या घरासमोर उभा होता.
त्याने पीडितेला ‘ए पोरी इकडे ये’ अशी हाक मारल्याने ती घाबरली घरी पळत गेली. घरात गेल्यावर आतून कडी लावून आत बसली. हे पाहून अण्णा वैद्य याने दरवाजाला लाथा मारून दार तोडून घरात आला.
तू बोलावले तर का आली नाहीस असे म्हणत केस धरून तिला घराबाहेर काढून मारहाण केली. नातेवाईक मध्ये आले असता त्यांनाही मारण्याचा दम दिला. हे पाहून गावातील काही माणसं गोळा झाली व त्यातील काहींनी मला कसेबसे त्याच्या तावडीतून सोडवले असे फिर्यादीत म्हटले आहे.
काय आहे अण्णा वैद्यचा इतिहास ?
काही महिलांचा खून करून त्यांना शेतात पुरून ठेवल्याच आरोप त्याच्यावर होता. ताराबाई आसाराम राऊत (वय ४५) या महिलेचा खून करून पुरावा नष्ट केल्याच्या आरोपावरून संगमनेरच्या न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती.
खुनाच्या पहिल्या खटल्यात संगमनेर न्यायालयात त्याला झालेली जन्मठेप उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवल्यानंतर काही महिन्यांत दुसऱ्या खुनाच्या खटल्यातून संगमनेरच्या न्यायालयाने त्याची निर्दोष सुटका केली होती. तिसऱ्या खटल्यात त्याला पुन्हा जन्मठेपेची शिक्षा झालेली होती तर एका महिलेच्या खुनाचा खटला प्रलंबित असल्याचे समजते.