१० जानेवारी २०२५ संगमनेर : एका मद्यपी महिलेने धुमाकूळ घालून शिवीगाळ केल्याची घटना बुधवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास येथील न्यायालयात घडली.याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, संगमनेर न्यायालयात हेड कॉन्स्टेबल सविता सोळसे या कोर्ट ऑर्डर्ली म्हणून कामकाज करत होत्या.
दुपारी एक वाजेच्या सुमारास अचानक एक महिला न्यायालयामध्ये मोठ-मोठ्याने आरडाओरड करत होती. महिलेचा आवाज ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी कोण आरडाओरडा करीत आहे, हे पाहण्यास सांगितले.तेव्हा सोळसे यांनी बाहेर येवून सदर महिलेस तुझे काही काम आहे, तु का आरडाओरड करते आहे, तुझे नाव काय, असे विचारल्यावर तिने ओरडतच तिचे नाव सांगितले.
कोर्टात माझा दावा चालू आहे व माझा दावा पाहणारे वकिल विश्वजीत देशमुख हे माझे दाव्याचे वकील पत्र काढून घेत आहे.माझा दावा लढविण्यासाठी वकील हवे आहे,असे म्हणून जोरजोरात ओरडू लागली.या महिलेने मद्य प्राशन केल्याचे दिसत होते.तिचा आरडाओरड पाहून सोळसे यांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला मात्र सदर मद्यपी महिलेने जोराचा धक्का देवून सोळसे यांना लोटुन दिले.कोर्टातील सर्व न्यायाधीश व पोलिसांना सदर महिलेने शिवीगाळ केली.
त्यानंतर महिला पोलीस पार्वती साबळे, दिपाली रहाणे, स्वाती नाईकवाडी, प्रतिभा थोरात, पोलीस कॉन्स्टेबल देशमुख हे तिथे आले, सदर महिलेने त्यांनाही शिवीगाळ केली. मी कोण आहे, तुम्हाला माहिती आहे का, तुम्हाला बघून घेईल, तुम्ही मला ओळखत नाही, असे म्हणून दमदाटी केली केली.
सदर महिलेने न्यायालयाच्या आवारात शांतता भंग करुन सरकारी कामकाजात अडथळा निर्माण केला. याबाबत हेड कॉन्स्टेबल सविता सोळसे यांनी येथील शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्या फिर्यादीवरून पोलिसांनी सदर महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.