Ahmednagar Crime News : मोटारसायकलचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून एकाला सहा जणांनी विटांनी मारहाण केली. तसेच चाकूने पोटावर वार करून जखमी केल्याची घटना शहरातील चाणक्य चौकात घडली. फ्रान्सिस विलास उबाळे (रा. पंचशीलवाडी रेल्वे स्टेशन अहमदनगर) असे या घटनेत जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. यातील चार आरोपींना कोतवाली पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, फ्रान्सिस विलास उबाळे हे मोटारसायकलवरून चालले असताना चाणक्य चौकाच्या जवळ समोरून येणार्या अनोळखी मुलांचा धक्का त्यांच्या गाडीला लागला. त्यावरून त्या ठिकाणी वाद झाला. वाद झाल्यानंतर आरोपींनी विटांनी मारहाण केली. यातील विशाल भंडारे याने त्याच्याकडील छोट्या चाकूने फ्रान्सिस उबाळे यांना पोटाच्या डाव्या बाजूला मारले.
त्यावरून त्यांना २ टाके पडलेले असून छातीजवळ काही प्रमाणात मारहाण झालेली आहे. याबाबत कोतवाली पोलिसांना माहिती मिळताच पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे गुन्हे शोध पथक आणि तपास पथकासह तात्काळ त्या ठिकाणी पोहोचले. येथील माहितीवरून सदर गुन्ह्यात शुभम धुमाळ (रा.सारसनगर), संकेत खापर (रा.वनायक नगर ), विशाल भंडारी (रा.वाकोडी रोड), गोविंद पवार (रा.भोसले आखाडा ) आणि इतर दोन असे सहा आरोपी असल्याबाबत कोतवाली पोलिसांनी निष्पन्न केले.
यातील शुभम धुमाळ, संकेत खापरे, विशाल भंडारी, गोविंद पवार, या चार आरोपींना तीन तासात अटक करण्यात आली. या झटापटीत आरोपी विशाल भंडारी किरकोळ जखमी असून, उपचारासाठी त्याला दवाखान्यात रवाना केले आहे. याबाबत जखमी उबाळे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.