Mumbai-Goa Vande Bharat :- मुंबई – गोवादरम्यान धावणाऱ्या वंदे भारत ट्रेनची रेल्वे प्रशासनाकडून १६ मे रोजी सीएसएमटी-मडगावदरम्यान चाचणी घेण्यात आली. यशस्वी चाचणी आणि महत्त्वाच्या तांत्रिक बाबी तपासणीनंतर अखेर शनिवार, ३ जून रोजी मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस प्रत्यक्ष धावणार आहे.
प्रवाशांना वेगवान, सुरक्षित, सर्व सोयी-सुविधा, आरामदायी प्रवास द्यावा, या उद्देशाने भारतीय रेल्वे अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या दिशेने वाटचाल करत आहे. वंदे भारत ट्रेनसारख्या सेमी हायस्पिड रेल्वे प्रत्यक्षात सुरू करून भारतीय रेल्वेने जगभरात वेगळा ठसा उमटवला आहे.
देशातील विविध १४ मार्गांवर हायटेक आणि अत्याधुनिक सेमी- हायस्पिड ट्रेन अर्थात वंदे भारत एक्स्प्रेस धावत असताना आता महाराष्ट्रासाठी आणखी एका वंदे भारत ट्रेनची भर पडणार आहे. ही नवी ट्रेन मुंबई ते गोवादरम्यान धावणार आहे.
मार्च महिन्यात रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी मुंबई ते गोवा वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. त्या पार्श्वभूमीवर मंगळवार, १६ मे रोजी सीएसएमटी- मडगांवदरम्यान वंदे भारत ट्रेनची चाचणी घेण्यात आली.
ही गाडी पहाटे ५.५० वाजता सीएसएमटीहून मार्गस्थ होत दुपारी १२.५० रोजी मडगाव येथे पोहोचली. तर दुपारी १.१५ वाजता पुन्हा ही ट्रेन मडगाव येथून सीएसएमटीसाठी रवाना होत मुंबई येथे रात्री ८.१५ वाजता पोहोचली आहे.
दरम्यान, अवघ्या ७ तासांत मडगाव गाठल्याने मुंबईहून कोकणाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांमध्ये या ट्रेनविषयी कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. ही उत्सुकता अखेर संपणार असून, येत्या ३ जूनपासून मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
कोकण मार्गावर अशी धावणार वंदे भारत या गाडीला रत्नागिरी जिल्ह्यात रत्नागिरी व खेड येथे थांबा देण्यात आल्याची माहिती कोकण रेल्वे प्रशासनाच्या विश्वसनीय सूत्रांकडून देण्यात आली आहे.
ही गाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथून सकाळी ५.३५ वाजता सुटेल. ठाणे ६.०५, पनवेल ६.४०, खेड ८.४०, रत्नागिरी १०.००, मडगाव दुपारी १.२५ अशा तिच्या वेळा असणार आहेत.
मडगाव येथून वंदे भारत दुपारी २.३५ वाजता सुटेल. परतीच्या प्रवासात रत्नागिरीतील तिची वेळ ५.३५ आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनसला ही गाडी रात्री १०.३५ वाजता पोहोचेल.