Ahmednagar Politics : आजकाल सोशल मीडियाचा जमाना आहे. यावर अनेकदा नको त्या गोष्टी पसरवल्या जातात. आज अनेक लोक विचारतात की काम कुणाचं करायचं, आज येथे जाहीर सांगतो की, खा. सुजय विखे यांचेच काम करायचे आहे. कुणी मनात शंका ठेवू नका, कोणत्या अफवांवर विश्वास ठेऊ नका असे आवाहन आ. संग्राम जगताप यांनी केले.
अहमदनगरमध्ये आज राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. या वेळी राष्ट्रवादी अजितदादा गटाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब नाहाटा, अनुराधा नागवडे, राजेंद्र नागवडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, नेते उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली.
आ. जगताप यावेळी म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी महायुतीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. त्यांचा आता सुजय विखे यांचे काम करण्याचा आदेश आहे. उद्या देशात पंतप्रधान मोदी हेच होणार आहेत.
त्यामुळे त्यांचाच उमेदवार आपण निवडून देणं गरजेचेच आहे. कारण आपले सगळे प्रश्न त्यांच्याजवळ नेऊन ठेवण्यात सुजय विखे हे सक्षम आहेत. जर आपण दुसरा उमेदवार निवडून दिला तर नुकसान विखे यांचे नाही होणार, कारण त्यांना काहीही कमी नाही.
नुकसान मात्र जनसामान्यांचे होणार असल्याचे जगताप म्हणाले. त्यांनी यावेळी एक जुना किस्साही सांगितला. ज्यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह लोणीत आले होते त्यावेळी आम्ही विखे यांच्याशी संपर्क केला. काही समस्या आहेत त्या मांडायच्या आहेत वेळ मिळेल का? त्यावेळी विखे यांनी क्षणाचाही विलंब न करता हो म्हटले व आमची एक बैठक घडवून आणली.
त्यामुळे सर्वाना न्याय देण्याचे काम विखे करतात असे ते म्हणाले. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी खा. सुजय विखे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आदींसह अनेक मान्यवरांनी आपले विचार मांडले.