Ahmednagar Politics : राजकारण कधी कोणत्या दिशेला कलाटणी घेईल हे काही सांगता येत नाही. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील राजकारणाबाबतही असाच काहीसा प्रत्येय येतोय. 18 व्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी भारतीय निवडणूक आयोगाने नुकताच निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या जागेसाठी महायुतीकडून भाजपाचा उमेदवार देण्यात आला आहे. भाजपाने या जागेवर पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे.
खरेतर हा लोकसभा मतदारसंघ ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असे. आता मात्र नगर दक्षिणचा हा गड भाजपाच्या ताब्यात आहे. 2009 पासून या जागेवरून सलग भाजपाचा उमेदवार खासदार म्हणून नियुक्त होत आहे. 2009 मध्ये दिवंगत भाजप नेते दिलीप गांधी यांनी या जागेवरून विजयी पताका फडकवली होती.
यानंतर 2014 मध्ये पुन्हा एकदा दिलीप गांधी यांनी येथून विजय मिळवला. तसेच 2019 मध्ये या जागेवरून काँग्रेस मधून भाजपामध्ये आलेले डॉक्टर सुजय विखे पाटील यांना भाजपाने तिकीट दिले आणि सुजय विखे पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम जगताप यांचा विक्रमी मताधिक्यांनी पराभव केला. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून दहा वेळा काँग्रेसचा खासदार राहिला आहे. ही जागा चार वेळा भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्षकडे प्रत्येकी एक वेळा गेली आहे.
खरेतर गेल्या निवडणुकीत अर्थातच 2019 च्या निवडणुकीत या जागेवरून विखे यांना काँग्रेस मधून उमेदवारी हवी होती. मात्र ही जागा तत्कालीन आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस यांच्याकडे होती. त्यावेळी मात्र शरद पवार यांनी ही जागा विखे यांच्यासाठी सोडली नाही. तसेच विखे यांना राष्ट्रवादी काँग्रेस मधूनही या जागेसाठी तिकीट दिले नाही.
त्यावेळी दिलीप गांधी यांच्या विरोधात मतदार संघात नाराजी असल्याच्या चर्चा होत्या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने या जागेवरून विजय मिळवण्याची संधी गमावली. दरम्यान तत्कालीन आघाडीच्या या निर्णयामुळे सुजय विखे हे काँग्रेससोडून भाजपामध्ये गेलेत. म्हणून गेल्या निवडणुकीत विखे विरुद्ध पवार असा सामना या ठिकाणी पाहायला मिळाला.
आता तर या जागेवर महाविकास आघाडीकडे उमेदवारच नसल्याचे वास्तव आहे. राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर येथे शरद पवार गटाकडे उमेदवाराचा दुष्काळ पडला असल्याच पाहायला मिळत आहे. यामुळे आता शरद पवार गटाला या जागेसाठी महायुती मधील अजितदादा यांच्या गटाकडून उमेदवार आयात करावा लागणार असल्याचे चित्र आहे.
विशेष म्हणजे उमेदवाराची आयात प्रक्रिया जवळपास पूर्ण झालेली आहे, फक्त यावर शिक्कामोर्तब होणे बाकी आहे. या जागेवरून पारनेरचे आमदार निलेश लंके हे निवडणूक लढवतील अशा चर्चा आहेत. निलेश लंके हे सध्या अजितदादा यांच्या समवेत आहेत. मात्र ते लवकरच शरद पवार यांच्या गटात सामील होतील, हाती तुतारी घेतील आणि या जागेवरून महाविकास आघाडीचा चेहरा असतील अशा चर्चा आहेत.
या चर्चांना आज आणखी बळ मिळाले आहे.कारण की आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंके यांची जोरदार एंट्री होणार आणि यंदाची निवडणूक देखणी होणार असे वक्तव्य केले आहे. यावरून सुजय विखे यांच्या विरोधात निलेश लंके यांची उमेदवारी राहणार हे स्पष्ट झाले आहे. परिणामी यंदाच्या निवडणुकीत पुन्हा एकदा पवार विरुद्ध विखे असा सामना पाहायला मिळू शकतो. शरद पवार यांच्या पक्षाकडून निलेश लंके हे जरी उभे राहणार असले तरी देखील प्रत्यक्षात मात्र पवार विरुद्ध विखे अशीच लढत राहणार आहे.
दरम्यान यंदाच्या नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत अहमदनगरचे अहिल्यानगर असे झालेले नामांतर, मराठा आणि धनगर आरक्षणाचे आंदोलन, मधल्या काळात तयारी करताना दोन्ही उमेदवारांनी सरकारी योजना आणि वैयक्तिक स्वरूपात मदतीचे केलेले काम, लंके यांचे करोना काळातील काम, रस्त्यासाठीची आंदोलने, तर विखे पाटील यांचे केंद्र-राज्य सरकारच्या वैयक्तिक लाभाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्याचे काम हे मुद्दे प्रचारात महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. नगरमध्ये झालेले उड्डाणपुलाचे काम, महामार्गांची कामे, नगर-परळी रेल्वेचे काम, पाणी प्रश्न, कांद्यासह शेतीमालाचा भाव, नैसर्गिक अपत्ती आणि नुकसानभरपाई असे विविध प्रश्न अन मुद्दे या प्रचारात नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीचा विजय ठरवणार आहेत. त्यामुळे यंदा लंके अर्थातच पवार विरुद्ध विखे या लढतीत कोण विजयी होणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.