Ahmednagar Politics News : शरद पवार गटाने काल आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात पाच उमेदवारांची नावे होती. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून निलेश लंके यांना उमेदवारी देण्याचा निर्णय झालेला आहे. निलेश लंके यांचे देखील कालच्या पहिल्या यादीत नाव आले आहे. यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून ज्या चर्चा होत्या त्या आता अधिकृत रित्या खऱ्या ठरल्या आहेत.
आता निलेश लंके हे महाविकास आघाडीचे नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार राहणार आहेत. तुतारी चिन्हावर निलेश लंके यंदाची लोकसभा निवडणूक लढवणार आहेत. दुसरीकडे, महायुतीकडून या जागेवर भाजपाने उमेदवार दिला आहे.
भाजपाने विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा येथून तिकीट दिले आहे. यामुळे यंदाची निवडणूक सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशी काटेदार होणार आहे. लंके विरुद्ध विखे अशी ही निवडणूक असली तरी देखील प्रत्यक्षात शरद पवार विरुद्ध विखे अशीच ही राजकीय लढाई रंगणार आहे.
या लढाईत सारे विखे विरोधक एकवटणार आहेत. किंबहुना विखे विरोधक एकत्रित जमू सुद्धा लागले आहेत. दरम्यान निलेश लंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पक्षाने उमेदवारी दिल्यानंतर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली आहे.
थोरात यांच्या सुदर्शन बंगल्यावर मध्यरात्री निलेश लंके यांनी त्यांची भेट घेतली. या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास दीड तास बंद दाराआड चर्चा झाली आहे. यावेळी लंके यांनी थोरात यांचे आशीर्वाद देखील घेतलेत. दरम्यान या दोन्ही नेत्यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देखील दिली आहे.
काय म्हटलेत अहमदनगरमधील महाविकास आघाडीचे उमेदवार ?
निलेश लंके आता नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातुन महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत. दरम्यान त्यांनी थोरात यांची भेट घेतल्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी लंके यांनी, ‘राज्यातील सुसंस्कृत नेता म्हणून ओळख असलेल्या थोरात यांची मी भेट घेतली. त्यांनी निवडणुकीला सामोरे कसं जायचं, याचं मार्गदर्शन केल. विखे यांच्याबाबत नगर दक्षिणची जनता निर्णय घेईल’, असे म्हटले आहे.
बाळासाहेब थोरात काय म्हटलेत ?
अहमदनगर मधील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी निलेश लंके यांच्या समवेत झालेल्या भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणालेत की, ‘नीलेश लंके हा छोटा कार्यकर्ता असला तरी फार गुणी आहे.
सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा हा कार्यकर्ता आहे. नगर दक्षिणची लढाई ही ‘श्रीमंत विरुद्ध गरिबी’ अशी आहे. यात नीलेश लंके विजयी होतील.’ एकंदरीत थोरात यांनी लंके हेच नगर दक्षिण मधून विजयी होतील असा विश्वास यावेळी बोलून दाखवला आहे.
खरे तर यंदा विखे विरुद्ध निलेश लंके असा हा सामना खूपच रोमांचक अन काटेदार होणार आहे. बाळासाहेब थोरात यांच्या भाषेत बोलायचं झालं तर यंदाची निवडणूक खूपच देखणी होणार आहे.