विधानसभा निवडणूक

अहमदनगरमध्ये आमदार राम शिंदे ठरणार किंगमेकर ! सुजय विखे विरुद्ध निलेश लंके लढत होणार काटेदार ?

Ahmednagar Politics News : यंदा होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची आणि नेत्यांची जय्यत तयारी सुरू झाली आहे. विविध राजकीय पक्ष आता आपल्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करत आहेत. भारतीय जनता पक्षाने देखील नुकत्याच काही दिवसांपूर्वी आपल्या अधिकृत उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. या दुसऱ्या यादीतुन भाजपाने महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

खरेतर डॉक्टर सुजय विखे पाटील 2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सोडून भारतीय जनता पक्षात सामील झालेत. त्यांचे भारतीय जनता पक्षात येण्याचे निमित्त होते लोकसभेची उमेदवारी. विशेष म्हणजे ते ज्या कामासाठी बीजेपीमध्ये आलेत ती नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी त्यांना मिळाली. उमेदवारीही मिळाली आणि त्यांनी विक्रमी मताधिक्यांनी विजय देखील मिळवला. या कामी त्यांना त्यांचे वडील आणि तत्कालीन काँग्रेसचे दिग्गज नेते राधाकृष्ण विखे पाटील यांची मोलाची साथ मिळाली.

दरम्यान आपल्या मुलाने भाजपाच्या तिकिटावर दमदार विजय मिळवल्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील भाजपाची वाट पकडली. विखे पिता-पुत्र भाजपवासी झाले. पण, त्यांच्या भाजपात येण्याचा मुहूर्त हा पक्षासाठी नुकसानदायक ठरला. कारण की विखे पिता पुत्र भाजपात आल्यानंतर भारतीय जनता पक्षाला नगर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. गेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये राम शिंदे यांना देखील पराभव पत्करावा लागला.

रामभाऊंनी मात्र पराभवाचे खापर विखे यांच्यावर फोडले. विशेष म्हणजे त्यांनी विखे पिता-पुत्र यांची लेखी तक्रारही वरिष्ठ नेत्यांकडे केली होती. तेव्हापासून विखे आणि राम शिंदे यांच्यात कुरघोडीची लढाई सुरू आहे. मतदार संघातील अनेक कामांवर आमदार राम शिंदे यांनी वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी विखे पिता-पुत्र यांचा उघड-उघड विरोध सुरू केला आहे. विशेष म्हणजे रामभाऊंनी नगरदक्षिणमधून लोकसभा लढवण्याची इच्छा देखील बोलून दाखवली होती.

भाजपाच्या अनेक जुन्या निष्ठावंत पदाधिकाऱ्यांनी आणि नेत्यांनी देखील रामभाऊंना उमेदवारी मिळायला पाहिजे असा सुर दबक्या आवाजात का होईना पण आवळायला सुरुवात केली होती. पण, भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी पुन्हा एकदा नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा किल्ला सुजय विखे यांना लढवण्याची जबाबदारी दिली आहे. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ हा गेल्या चार ते पाच पंचवार्षिकेपासून बीजेपीचा बालेकिल्ला आहे.

यावेळी सुजय विखे यांना हा बालेकिल्ला तसाच राखायचा आहे. यामुळे त्यांना गेल्या पंचवार्षिकेपेक्षा अधिक मेहनत यंदाच्या निवडणुकीत घ्यावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर त्यांची तयारीही सुरू झाली आहे. दरम्यान या निवडणुकीत सुजय विखे यांच्या पुढे महाविकास आघाडीकडून निलेश लंके यांना उभे केले जाऊ शकते अशा चर्चा आहेत. जर समजा या चर्चा खऱ्या ठरल्यात आणि विखे विरुद्ध लंके अशी लढत झाली तर यावेळी विखे यांना विजयी पताका फडकवण्यासाठी आमदार राम शिंदे यांची मोलाची साथ मात्र लागणार आहे.

कारण की, कर्जत जामखेड तालुक्यात अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी आमदार राम शिंदे यांच्या विचारसरणीला आदर देणारे आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर फडणवीस यांचे अगदी निकटवर्तीय समजले जाणारे रामभाऊ थोडेसे बॅकफुटवर गेले होते. परंतु फडणवीस यांच्याशी असलेली जवळीक त्यांच्या कामी आली आणि त्यांना विधान परिषदेतून आमदारकी मिळाली.

यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा एकदा नवीन संजीवनी संचारली आहे. अशा परिस्थितीत जर सुजय विखे यांना यंदाच्या निवडणुकीतही विजयी घोडदौड सुरु ठेवायची असेल तर आमदार राम शिंदे यांच्यासोबतचे राजकीय वैर विसरावे लागणार आहे. रामभाऊंची नाराजी विखे यांना त्रासदायक ठरू शकते. विखे पिता पुत्र देखील ही गोष्ट ओळखून आहेत.

यामुळे सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रामभाऊची भेट घेतली आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनी राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि जवळपास दीड तास त्यांच्या समवेत चर्चा केली. बंद दाराआड झालेली ही चर्चा सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके अशी लढत झाल्यास किंगमेकर राम शिंदेच राहतील हे दर्शवत आहे.

आगामी निवडणुकीत विखे यांना शाश्वत विजय हवा असेल तर राम शिंदे यांची नाराजी दूर करावी लागणार आहे. खरंतर आमदार राम शिंदे आणि निलेश लंके यांच्या मैत्रीचे किस्से आता राजकीय वर्तुळात खूपच व्हायरल होत आहे. निलेश लंके यांचे व्यासपीठ असले तर राम शिंदे आवर्जून हजेरी लावतात. यामुळे जर भविष्यात महाविकास आघाडीकडून लंके यांना उमेदवारी मिळाली तर राम शिंदे मैत्रीसाठी काम करणार की पक्षासाठी काम करणार हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.

Tejas B Shelar

Based in Ahmednagar, Maharashtra, I Am a Founder Editor for Ahmednagarlive24, Covering Politics, Technology, Automobile, Finance, Investment and Share Market Related News. For News Tips, You Can Reach Me at edit.tejasbshelar@gmail.com

Published by
Tejas B Shelar

Recent Posts