Ahmednagar Politics News : नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाने आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आपल्या अधिकृत उमेदवारांची पहिली यादी जारी केली आहे. यामध्ये मात्र महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचा समावेश नाहीये. विशेष बाब अशी की काँग्रेसने देखील आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे आणि यामध्ये देखील महाराष्ट्रातील एकाही उमेदवाराचे नाव नाहीये.
यावरून महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये जागा वाटपावरून अजूनही गदारोळ सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच, मात्र आता महाविकास आघाडीमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची डोकेदुखी वाढणार असे चित्र आहे. खरंतर अहमदनगर जिल्ह्यात दोन लोकसभेच्या जागा आहेत.
शिर्डी लोकसभा मतदारसंघ आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघ या त्या दोन जागा. यातील नगर दक्षिणची जागा महाविकास आघाडीमधील शरद पवार यांच्या गटाला मिळणार अशी शक्यता आहे. दुसरीकडे शिर्डीची जागा महाविकास आघाडीमधील उबाठा शिवसेनेला मिळू शकते.
दरम्यान, याच जागेवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाची डोकेदुखी वाढणार असे पाहायला मिळत आहे. खरेतर पक्षात या जागेसाठी इच्छुकांची संख्या वाढत आहे. मात्र, पक्षाकडून अलीकडेच पक्षात दाखल झालेल्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना तिकीट दिले जाईल अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे वाकचौरे यांच्याकडूनही याची तयारी सुरू झाली आहे. अशातच, मात्र वाकचौरे यांच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा समन्वयक अशोक गायकवाड यांनी बंड पुकारले आहे.यामुळे उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढणार हे स्पष्ट होत आहे.
अशोक गायकवाड यांनी उघडपणे वाकचौरे यांच्या विरोधात मोर्चा खोलला असून याबाबत त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी पत्रकार परिषदेत अशोक गायकवाड यांनी असे म्हटले आहे की, “शिर्डीच्या साईबाबा, उध्दव ठाकरे आणि जनतेला फसविणारे पुन्हा शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे दावेदार, हे दुर्देव आहे.
आपण शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवार म्हणून योग्य असल्याचे वरिष्ठांना पटवून दिले आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी दिल्यास आपण बंड करणार असून अशा प्रवृत्ती गाडल्या गेल्या पाहिजे.”, असे स्पष्ट मत मांडले आहे. एकंदरीत, गायकवाड यांनी वाकचौरे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
यावेळी प्रसारमाध्यमांनी जर वाकचौरे यांना उद्धव ठाकरे यांनी तिकीट दिले तर तुम्ही प्रचार करणार का असा प्रश्न उपस्थित केला होता ? यावर उत्तर देताना गायकवाड यांनी, मी बंड पुकारून त्यांच्याविरुध्द शिर्डी मतदारसंघातून निवडणूक लढवणे पसंद करेल, पण त्यांचा प्रचार करणार नाही अशी भूमिका बोलून दाखवली आहे.
पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, मी एक शेतकरी असून सर्वसामान्य माणसांच्या प्रश्नासाठी नेहमीच तत्पर असतो. उमेदवारीसाठी वरिष्ठ स्तरावरून प्रयत्न सुरू आहेत. माझा व्यक्तीला विरोध नसून प्रवृत्तीला आहे. त्यांचे काम मी करणार नाही, असे मत गायकवाड यांनी व्यक्त केले आहे. तसेच उध्दव ठाकरे यांनी कोकणसह अन्य ठिकाणचे उमदेवार जाहीर केले. मात्र शिर्डीच्या उमेदवार जाहीर केलेला नाही.
त्यामुळे येथील उमेदवारी वाकचौरे यांनाच मिळेल, असे नाही. वाकचौरे यांच्या व्यतिरिक्त कोणाला उमेदवारी दिली तर त्यांचा प्रचार करू, असेही गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. यामुळे आता उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून या जागेवर कोणाला तिकीट मिळते हे विशेष पाहण्यासारखे राहणार आहे.