Ahmednagar Politics : नगर दक्षिण लोकसभेच्या आखाड्यात यंदा गेल्या वर्षी प्रमाणेच दोन युवा नेते परस्परांच्या विरोधात उभे आहेत. महाविकास आघाडीने नगर दक्षिण मधून महायुतीमधून आयात केलेला उमेदवार अर्थातच निलेश लंके यांना उभे केले आहे दुसरीकडे महायुतीने आपला गेल्या वर्षीचा विजयी गडी अर्थातच विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान या दोन्ही युवा नेत्यांनी लोकसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. सुजय विखे पाटील यांच्यासह संपूर्ण महायुती पुन्हा एकदा विक्रमी मताधिक्यांनी विजय मिळावा यासाठी प्रचाराला लागली आहे.
वास्तविक सुजय विखे पाटील यांनी आधीपासूनच म्हणजेच तिकीट मिळण्याआधीच आपल्या लोकसभा मतदारसंघात निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. त्यांनी यंदाच्या निवडणुकीत देखील त्यांचाच विजय होणार असा आशावाद व्यक्त केला आहे.
आपण गेल्या पाच वर्षांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली विकास कामे पूर्ण केली आहेत यामुळे जनता जनार्दन पुन्हा एकदा आपल्याला दिल्लीत पाठवणार असल्याचा विश्वास विखे पाटील यांनी व्यक्त केला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांनी देखील जनसंवाद यात्रा सुरू करून पुन्हा एकदा मतदारसंघात जनसंपर्क वाढवण्यास सुरुवात केली आहे.
परंतु निलेश लंके यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात नाराजी आहे की काय अशा चर्चा सध्या नगरच्या राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत. पक्षाचे सुप्रिमो शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार हे निलेश लंके यांच्यावर नाराज आहेत की काय? अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या चर्चा तेव्हाच सुरू झाल्या होत्या जेव्हा निलेश लंके यांनी लिहिलेले मी अनुभवलेला कोविड या पुस्तकाचे विमोचन पार पडले.
खरेतर पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कार्यालयात पार पडलेल्या निलेश लंके यांच्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यात सुप्रीमो शरद पवार यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी नीलेश लंके हे कार्यकर्त्यांसह पुण्यात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयात हजर झाले होते. त्या आधी एक पत्रकार परिषद देखील झाली होती. त्यावेळी हा घटनाक्रम महाविकास आघाडीचा नगर दक्षिणचा उमेदवार कोण राहणार ? याचे स्पष्ट संकेत देणारा होता.
विशेष म्हणजे त्यावेळी निलेश लंके हे शरद पवार यांच्या गटात प्रवेश करू शकतात अशा चर्चाही सुरू होत्या. मात्र, असे असतानाही त्या कार्यक्रमाला शरद पवार यांचे नातू आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी दांडी मारली हे विशेष. यामुळे तेव्हापासून रोहित पवार हे निलेश लंके यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहेत.
वास्तविक, पारनेरचे माजी आमदार लंके आणि कर्जत जामखेडचे माजी आमदार तथा भाजपाचे विद्यमान विधानपरिषद आमदार राम शिंदे यांचा याराना संपूर्ण नगर जिल्ह्याला ठाऊक आहे. जेव्हा निलेश लंके हे महायुतीमध्ये होते आणि ते विखे पाटील यांच्या विरोधात दंड थोपटत होते तेव्हा रामभाऊंनी निलेश लंके यांच्या व्यासपीठावर आवर्जून हजेरी लावली हे त्यांच्या स्ट्रॉंग फ्रेंडशिपचे द्योतक होते.
मात्र लंके यांना आता लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांची ही फ्रेंडशिप कुठे ना कुठे बॅकफुटवर घेऊन जात आहे. कारण की, कर्जतमध्ये राम शिंदे हे रोहित पवारांचे कट्टर विरोधक आहेत. रामभाऊंना पराभूत करतच रोहित दादांनी विधानसभेत प्रवेश घेतला आहे.
हे दोघेही राजकारणातील प्रतिस्पर्धी आहेत. यामुळे रोहित पवार यांना लंके आणि राम शिंदे यांची फ्रेंडशिप खटकत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे नगरचे पवार हे निलेश लंके यांच्यावर नाराज असल्याच्या चर्चा पाहायला मिळत आहेत. हेच कारण आहे की, रोहित पवार हे निलेश लंके यांच्यापासून अंतर ठेवत असल्याचे पाहायला मिळत असल्याचा दावा राजकीय विश्लेषकांनी केला आहे.
मात्र जर हे खरे असेल तर आगामी लोकसभा निवडणुकीत कर्जत जामखेडचे मतदार निलेश लंके यांच्याकडे वळणे अशक्य आहे. शिवाय राम शिंदे यांनी देखील सुजय विखे पाटील यांना पुन्हा एकदा खासदार बनवूच असा निर्धार आता केला आहे. यामुळे निलेश लंके यांच्यावर जर रोहित पवार नाराज असतील तर ही त्यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते.