Ahmednagar Politics : अहमदनगर जिल्ह्यातील उत्तरेचा भाग पाणलोट क्षेत्रामुळे सुजलाम सुफलाम असणारा भाग. उस उत्पादन व साखरनिर्मितीमुळे साखरसम्राट तयार झाले. शेतकऱ्यांनाही दोन पैसे मिळाले व शेतकरीही इज्जतदार बागायतदार झाले. याचा परिणाम राजकारणावरही दिसला.
लोकसभेला उत्तरेत असणारा शिर्डी लोकसभा मतदारसंघावरही याचा राजकीय परिणाम दिसून आला. शुगर लॉबीचे निर्विवाद वर्चस्व या मतदार संघावर पाहायला मिळाले. परंतु काळाच्या ओघात हा मतदारसंघ राखीव झाला अन राजकीय गणिते बदलायला सुरवात झाली.
राजकरणावर वर्चस्व ठेऊ पाहणाऱ्या शुगर लॉबीला आपल्या राजकीय आकांक्षांना मुरड घालावी लागली. यातूनच मग शुगर लॉबीशी दुरान्वये संबंध नसलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांना एकदा, तर दोन वेळा सदाशिव लोखंडे यांना खासदार होण्याची संधी मिळाली.
आता पुढील निवडणुकीपासून हा मतदारसंघ खुला होणार आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीतील राजकीय गणिते बदलताना दिसतील. शुगर लॉबीचा मोठा प्रभाव असताना देखील केवळ हा मतदारसंघ राखीव झाल्याने येथून एकदा वाकचौरेंना, तर दोनदा लोखंडेंना लोकसभेत जाण्याची संधी मिळाली.
साई संस्थानचे कार्यकारी अधिकारी असल्याने वाकचौरे हे मतदारसंघात सर्वदूर परिचित होते. निवृत्तीनंतर त्यांना खासदार होण्याचे वेध लागले. कारण हा मतदार संघ २००९ साली राखीव झाला. त्यांची काँग्रेसची दारे ठोठावली. मात्र दोन्ही काँग्रेसने विद्यमान केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना उमेदवारी दिली.
शिवसेना उमेदवाराच्या शोधात होती आणि वाकचौरेंना निवडणूक लढवायचीच होती. या निवडणुकीत पदार्पणातच ते लोकसभेत गेले. वाकचौरे काँग्रेसमध्ये गेले आणि इकडे कोपरगावचे माजी आमदार अशोक काळे आणि श्रीरापूरचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी इच्छा नसताना लोखंडेंना शिवसेनेकडून तिकीट द्यावे लागले.
ते दोनदा खासदार झाले. दरम्यान, आठवले यांनी एनडीएची वाट धरली. ते केंद्रात मंत्री झाले. आमदार राधाकृष्ण विखे पाटलांनी भाजपची वाट धरली ते राज्यात महसूलमंत्री झाले. आता शिर्डीत लोखंडे व वाकचौरे आमनेसामने असून या मतदारसंघातून त्यांना देखील ही शेवटची संधी असेल.
त्यानंतर मात्र हा खुला झाल्यानंतर पुन्हा एकदा शुगर लॉबीमध्ये राजकीय वर्चस्वातून राजकीय रस्सीखेच पाहायला मिळेल.
वाकचौरे व खा. लोखंडे…
पहिल्यांदा निवडून आल्यानंतर कचौरे यांनी गाव तेथे मंदिराचा सभामंडप हा काहीसा वेगळा उपक्रम राबवीला. पण त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला व पक्षांतराचा मुद्दा ऐरणीवर आल्याने ते पडले, पण या निवडणुकीत त्यांना त्या संपर्काचा फायदा होऊ शकतो असे म्हटले जात आहे.
तर दुसरीकडे ५२ वर्षे रखडलेल्या निळवंडे धरण आणि कालव्यांची कामे मार्गी लावणे, कालव्याद्वारे पाणी थेट शेतापर्यंत नेणे, ही दोन सर्वाधिक महत्त्वाची कामे खा. लोखण्डे यांनी मार्गी लावल्याने त्यांना दोनदा खासदारकीची संधी मिळाली. आता यावेळी वाटते तितकी लढाही सोपी राहिलेली नाही असे लोक म्हणतात.