Ahmednagar Politics : अहमदनगर लोकसभेच्या निवडणुकीत आता चांगलाच रंग भरू लागला आहे. विखे विरोधात लंके ही फाईट होणार असल्याने वातावरण मात्र एकदम टाईट झाले आहे. लोकांच्या चर्चाही आता चांगल्याच रंगतदार होऊ लागल्या आहेत.
असे असतानाच आता खा. सुजय विखे यांचे एक वक्तव्य चांगलेच चर्चेत आले असून राजकीय चर्चांनी जोर धरला आहे. ‘… तर मी निलेश लंकेंच्या विरोधात लोकसभेसाठी अर्ज भरणार नाही’ असे त्यांचे वक्तव्य आहे. पण त्यांनी हे वक्तव्य का केले? नेमके कोणते आव्हान समोर ठेवले आहे? चला पाहूयात…
नेमके काय म्हणाले खा. विखे पाटील ?
मी जेवढी इंग्रजी बोलतो तेवढी इंग्रजी निलेश लंके यांनी पाठ करून बोलावी, त्यांनी जर असे केले तर मी उमेदवारी अर्जच भरणार नाही असे आव्हानच त्यांनी दिले. अहमदनगर शहरात राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात सुजय विखे पाटील बोलत असताना त्यांनी हे आवाहन केलं.
या मेळाव्याच्या सुरुवातीला सुजय विखेंनी संसदेत इंग्रजीत केलेल्या भाषणाचा एक व्हिडीओ आधी दाखवला होता. तो व्हिडीओ पाहून झाल्यावर त्याचा आधार घेत सुजय विखेंनी निलेश लंकेंनी इंग्रजी बोलण्याचं आव्हान केलेलं आहे. महिनाभरात जरी त्यांनी हे इंग्रजीतील भाषण पाठ करून म्हणून दाखवल तरी चालेल असेही त्यांनी म्हटले आहे.
निवडणूक कोणतीही असो या रणधुमाळीत एकमेकांचे खच्चीकरण करण्यासाठी विरोधक एकमेकांवर तोफ डागत वेगवेगळं आव्हान देतात व त्याच्यातून राजकीय कलगीतुराही रंगत असतो. परंतु हा विषय निवडणुकांपुरताच असतो कालांतराने हा विषय संपवला जातो.
एकमेकांवर घणाघात
अहमदनगर लोकसभा मतदारसंघ हा राज्यातील एक लक्षवेधी ठरला असून राज्याचे लक्ष या निवडणुकीच्या निकालाकडे असेल. सध्या दोन्ही बाजूंनी आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात असून सुजय विखेंनी मागील 10 वर्षांमध्ये नगरच्या विकासासाठी काहीच केलं नसल्याचा आरोपही निलेश लंकेंनी केला आहे. तसेच आपण दोन लाखांच्या मताधिक्क्याने जिंकणार असा दावाही निलेश लंके यांनी केलाय.